आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाल्य म्हणजे स्वप्नपूर्तीचे पासबुक नव्हे.!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शेतकर्‍यांप्रमाणे आज तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी मुलांकडे एक उत्पादन म्हणून पाहू नये. पाल्य म्हणजे स्वप्नपूर्तीचे पासबुक नव्हे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. शनिवारी युवक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘वय वादळ विजांचं’ या विषयावरील व्याख्यानासाठी ते शहरात आले होते. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी विद्या गावंडे यांनी संवाद साधला. दवणे यांची मते त्यांच्याच शब्दांत..

आज कागदावर शंभर गुण मिळाले की विद्यार्थी हुशार समजला जातो; परंतु ही गुणवत्ता पुढच्या आयुष्यात कामी येते का, याचा जागरूक होऊन पालकांनी विचार करण्याची गरज आहे. शिक्षक व पालक या पदांमध्ये खूप शक्ती आहे; परंतु हे नाते आज बोथट झाले आहे. आजच्या मुलांना केवळ परीक्षेचे संमोहन होऊन नशा चढल्यासारखी वाटते. एक परीक्षा झाली की दुसरी, नंतर तिसरी याच दृष्टचक्रात तो आपला कल, आवडीनिवडी विसरून गेला आहे.

आई-वडिलांना त्यांच्या वयात ज्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्या देण्याचा ते निष्ठेने प्रयत्न करतात. यात महागडा मोबाइल, गाड्या, कपडे अशा दिखावू वस्तूंचा समावेश होतो. कुठलीही सामाजिक बांधिलकी असणारी सेवा देताना तिचा वापर कसा करावा, याचे शिक्षण मात्र मुलांना कुणीही देत नाही. वाट चुकलेल्या विद्यार्थी, पालकांसाठी समुपदेशनाची गरज आहे.

युवकाच्या कर्तृत्वावर त्याचे आयुष्य आणि राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते. याच काळात मानसिक ,भावनिक आणि आर्थिक वादळेही त्याच्या आयुष्यात येतात. अशा वेळेस वास्तवाशी धागा जुळवून घेऊन कसे वागावे, यासाठी ‘वय वादळ विजांचं’ या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा माझ्या पुस्तकांत मांडलेल्या अनुभवांचा विषय ठेवण्यात आला आहे.