आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिशन मोदी’तून प्रवीण तोगडिया बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या वर्षभरापासून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी फील्डिंग लावून काम करणार्‍या भाजपने या ‘मिशन’मधून विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री प्रवीण तोगडिया यांना मात्र बाहेरच ठेवले आहे. हिंदुत्व आणि विकास असा दुहेरी अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपने आतापर्यंतच्या निवडणुकांत ज्यांचे प्रभावी वक्तृत्व वापरून घेतले त्या तोगडियांना बाजूला सारले आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही चक्क ‘इंडिया हेल्थ लाइन’ या आरोग्यविषयक मोहिमेचे काम घेऊन निघालेले तोगडिया राजकारणावर ब्र शब्दही काढायला तयार नाहीत.

संघ परिवाराच्या आक्रमक हिंदुत्वाची जबाबदारी सांभाळणार्‍या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटना यंदाच्या ‘मिशन मोदी’मधून पद्धतशीरपणे बाजूला ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही संघटनांच्या भाषणांची भाजपला मदत होत असे. त्यात तोगडिया, साध्वी ऋतंभरा यांची नावे प्रमुख आहेत. पण आता विकासाचा मुद्दा घेऊन मोदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भाजपला या नेत्यांची गरज राहिलेली नाही.

तोगडिया रविवारी औरंगाबादेत आले होते. या दौर्‍यात त्यांनी भाजप व शिवसेनेच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही. ‘इंडिया हेल्थ लाइन’ या मोहिमेसंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून ते निघून गेले. त्यामुळे स्थानिक नेते अस्वस्थ आहेत.

संघर्षाचे कारण : न्यायालयाच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगलीच्या फायली पुन्हा उघडल्या. तसेच विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यावरून तोगडियांनी मोदींच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. ऑगस्ट महिन्यात अहमदाबादेत पाकिस्तानी चित्रकारांच्या प्रदर्शनात तोडफोड करणार्‍या विहिंपच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आल्याने भडकलेल्या तोगडियांनी ‘हिंदूंवरच कारवाई करून काँग्रेसमुक्त भारत कसा होईल?’ अशा शब्दांत मोदींवर टीका केली होती. पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात मंदिराऐवजी शौचालयांना प्राधान्य द्या, या मोदींच्या विधानावरून तोगडियांनी हल्ला चढवत शौचालयांच्या चर्चेत मंदिर आणून भावना दुखवू नका, असे ठणकावले होते.

राजकीय भेटीही टाळल्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मिशन मोदी’मधून बाहेर ठेवण्यात आल्याने तोगडिया यांनी राजकीय भेटी टाळल्या व पत्रकारांशी बोलणेही टाळले. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने तोगडिया यांच्याशी संपर्क साधला असता मला राजकीय बोलायचेच नाही, आरोग्य मोहिमेबाबत बोलेन, असे सांगत त्यांनी नकार दिला.