आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pravin Togadia News In Marathi, Chandrakant Khaire, Shiv Sena

प्रवीण तोगडियांनी खैरेंना भेट नाकारल्याने सेना, भाजपच्या गोटात अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात आलेल्या विहिंपच्या प्रवीण तोगडिया यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना भेट नाकारली. या प्रकारामुळे शिवसेना आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असली तरी तोगडिया आणि खैरे यांच्या वेळा जुळून न आल्याने भेट होऊ शकली नाही, असे विश्व हिंदू परिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.


आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या मदतीला प्रवीण तोगडिया यांची प्रखर भाषणे येत असत. त्यामुळे तोगडिया यांची भेट घेण्यात या नेत्यांना कसलीही अडचण येत नसे. निवडणूक नसतानाही जेव्हा जेव्हा तोगडिया औरंगाबादेत येत तेव्हा खासदार चंद्रकांत खैरे त्यांची आवर्जून भेट घेत असत. या वेळी मात्र वेगळेच घडले.
मोदी लाटेवर स्वार होत दिल्लीचे स्वप्न पाहणार्‍या खैरे यांना भेट नाकारत तोगडिया यांनी चांगलाच झटका दिला. ‘इंडिया हेल्थ लाइन’ या आरोग्य सेवाविषयक उपक्रमासंदर्भात औरंगाबादेतील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी प्रवीण तोगडिया काल आले होते. दिवसभरात त्यांनी विहिंपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शहरातील 80 हून अधिक डॉक्टर्स यांच्या भेटीगाठी घेतल्या. निवडणुकीची धामधूम सुरू असताना तोगडिया यांची भेट घेण्याचा प्रयत्न खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला; पण तोगडिया यांचा कार्यक्रम एवढा व्यग्र होता की ही भेट होऊच शकली नाही.
विश्व हिंदू परिषदेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, तोगडिया यांच्या एक दिवसाच्या दौर्‍यात भरगच्च कार्यक्रम होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे मोकळा वेळ होता. पण नेमके त्याच वेळेस खासदार खैरे प्रचाराच्या कामानिमित्त शहराबाहेर होते. ते दुपारी चार वाजेपर्यंत परतणार होते, पण तोगडिया तीन वाजेच्या सुमारास जालन्याकडे जाणार असल्याने भेट होणे अशक्य असल्याचे खैरे यांना कळवण्यात आले होते.


मात्र, ही खैरे आणि तोगडिया यांची भेट न झाल्याने शिवसेनेमध्ये काहीसे अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांचे संबंध पाहता कडवट हिंदुत्ववादी मते मिळवण्याकामी ही भेट उपयोगी पडली असती, पण ती होऊ शकली नाही.