आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमचा पक्ष नव्हे; मोदींबाबत आम्हाला कोणी विचारले नाही - तोगडिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे केले आहे. त्यांना प्रचारप्रमुख करण्यापूर्वी आमचे मत विचारात घेतले गेले नाही. एवढेच नाही, तर भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष नाही, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले. शनिवारी ते शहरात आले होते. वेरूळला घृष्णेश्वराच्या अभिषेकानंतर सिडको येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोदी यांना लोकसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख करणे किंवा पंतप्रधानपदासाठी पुढे करणे ही भाजपची अंतर्गत बाब आहे. विहिंपचा त्याच्याशी थेट संबंध नसला तरी भाजपने यासंदर्भात आम्हाला एका शब्दानेही विचारले नाही. हिंदुत्वाचा आक्रमक पद्धतीने मुद्दा मांडणार्‍या मोदींना विश्व हिंदू परिषदेचे सर्मथन असल्याशिवाय पदावर बसणे अवघड जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. देशात 82 टक्के असलेला हिंदू समाज राजकीयदृष्ट्या अनाथ झाला आहे. 20 करोड अल्पसंख्यांसाठी देशात अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, शंभर कोटी हिंदूंना किरकोळ गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. उत्तराखंड येथे महाप्रलयातील पीडितांना विश्व हिंदू परिषद पूर्णत: मदत करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप आमचा पक्ष नव्हे

भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष नाही. जो राजकीय गट हिंदूंचे कल्याण करील तो आमचा पक्ष आहे. मग तो काँग्रेस, एनसीपी, सपा, बसप कोणताही पक्ष असो. अयोध्येचे राममंदिर, गोहत्याविरोधी कायदा, समान नागरी कायदा आणि घटनेतील 370 कलम रद्द या हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण करणाराच आमचा पक्ष असेल. एमआयएम आणि ओवेसीच्या भाषणांना मिळणारी प्रसिद्धी पाहून राजकीय पक्षांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की मुस्लिम समाज हा कुठल्याच पक्षाचा नसून तो केवळ एमआयएम आणि मुस्लिम लीगचाच आहे, असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला अप्पा बारगजे, शिवाजी शेरकर, अखिल वकील, सुभाष कुमावत, अभिजित पारीख उपस्थित होते.