आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर महिलांना ‘यूटीआय’चा धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गरोदर महिलांत मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) प्रमाण पाच टक्के असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास गरोदर महिलांसह बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा शहरातील वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.
जंतुसंसर्गाचे प्रमाण गरोदर महिलांमध्ये बरेच असते. गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यांत याचे प्रमाण जास्त असते. याकडे लक्ष वेधताना घाटी रुग्णालयाच्या प्रसूतिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, 9 महिन्यांत एक टक्का महिलांना याचा त्रास होतो. या काळात महिलेची प्रतिकारशक्ती कमी होते आणि जंतुसंसर्ग होऊ शकतो. शिवाय गर्भपिशवीचा आकार वाढल्याने लघवीच्या पिशवीवरील दाब वाढतो. परिणामी लघवी प्रक्रिया विस्कळीत होते आणि जंतुसंसर्ग बळावतो.
संसर्ग टाळणे गरजेचे - मूत्रमार्गाचा जंतुसंसर्गही गरोदरपणात त्रासदायक ठरू शकतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तसेच योग्य स्वच्छता न ठेवल्याने हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेही बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाज येणे, पाणी जाणे अशी लक्षणे असल्यास काळजी घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. गुप्तरोगामुळेही गरोदर महिलेस जंतुसंसर्गाचा धोका असतो. मात्र प्रभावी औषधांमुळे हे सर्व त्रास टाळता येतात.
दुर्लक्ष करणे धोकादायक - मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मुदतपूर्व काळात प्रसूती होणे, बाळाच्या वाढीवर परिणाम होणे किंवा गर्भपात होणे यासारखे प्रकार होऊ शकतात. गरोदर महिलेच्या मूत्रपिंडावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. यात काही वेळा गंभीर गुंतागुंत निर्माण झाली तर बाळ दगावू शकते. यासाठीच गरोदर महिलांनी भरपूर पाणी प्यावे.