आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (ए) कार्यकर्ता काकासाहेब काकडे (30) यांना लोखंडी टॉमीने बेदम मारहाण करण्यात आली. यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील वोक्हार्ट कंपनीसमोर रविवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार घडला.
मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी काकडे यांनी केला आहे. ते सध्या धूत रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 2010 मध्ये मनपा निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 23 मध्ये राजू शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या विरोधात काकासाहेब उभे होते. त्या वेळी काकासाहेब यांना 200 तर संजय शिंदे यांना 300 मते पडली होती. दोघांच्या भांडणात तिसरा उमेदवार संजय चौधरी यांचा 300 मतांनी विजय झाला होता. तेव्हापासून काकडे आणि शिंदे कुटुंबीयांत राजकीय तेढ निर्माण झाली होती. निवडणुकीदरम्यान शिंदे यांच्याकडून आपल्या जीविताला धोका आहे, अशी लेखी तक्रारही काकडे यांनी सर्व पोलिस अधिकारी व गृहमंत्र्यांकडे केली होती.
आठ दिवसांपूर्वी काकडे पत्नीसह दुचाकीवर जात असताना शिंदे यांचे सर्मथक युवराज भालेराव यांच्याशी भांडण झाले होते. मुकुंदवाडी पोलिसांत अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला. यानंतर रविवारी काकडे त्यांच्या मित्रासोबत जात असताना शिंदे सर्मथक भावड्या भालेराव, युवराज भालेराव, भीमराव भालेराव, संदीप भालेराव, आकाश शेळके, संजय शिंदे यांनी त्यांना बेदम मारहाण केली. काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भादंविच्या 395 कलमान्वये या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून काकडे व त्यांच्या सात साथीदारांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
राजू शिंदेंनी मारहाण केली
वॉर्डात माझे वर्चस्व निर्माण होत असल्याने राजू शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी मला बेदम मारहाण केली. यापूर्वीही शिंदे यांच्याकडून मला धमक्या आल्या होत्या. काकासाहेब काकडे, जखमी कार्यकर्ता.
मी काकडेला मारहाण केली नाही. काय झाले माहीत नाही. तो काही माझा प्रतिस्पर्धी नाही. मारहाणीशी माझा संबध नाही. राजू शिंदे, माजी सभापती, पालिका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.