आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Present Education System Only Fill Stamac Rajan Khan

आजची शिक्षणव्यवस्था फक्त पोटाची भूक शिकवणारी - राजन खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतून आपण पोटाच्या स्पर्धेतील रोबोट निर्माण करत आहोत. मेंदू बुद्धीने काम करण्याऐवजी सगळे पोटासाठीच काम करत आहेत. जगाची ७०० कोटी लोकसंख्या पोटाच्या स्पर्धेत आहे. यामुळे बौद्धिक स्पर्धा लुप्त होत आहे, अशी टीका प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा जनसंवाद वृत्तपत्र विभाग एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन यांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त बुधवारी आइन्स्टाइन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारूरकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, प्रताप बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खान म्हणाले, भारतीयांनी चमत्काराशिवाय काहीच तयार केले नाही. आपण विज्ञान केवळ अंगावर घेतो. आपल्या मेंदूमध्ये मात्र जातिभेद, लिंगभेद, धर्मभेदांनी जागा व्यापली आहे. माणसाला स्थिर करण्यासाठी, आधार देण्यासाठी विज्ञानाने परमेश्वराला निर्माण केले, परंतु कर्मकांडाने त्यात अडचणी निर्माण केल्या. 'साहित्य पत्रकारिता ' या विषयावर ते म्हणाले, साहित्य आणि पत्रकारितेत लिहिणे छापणे या दोन गोष्टी सोडल्या तर कुठलाच संबंध नाही. साहित्याला कुणी मालक नसतो. त्याला कुठले बंधने नसतात. मात्र, पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे काम करते. सध्याची मराठी माध्यमे इंग्रजी शब्दाचा वापर करत मराठी भाषेला लुप्त करण्यासाठी अप्रत्यक्ष मदतच करत असल्याची टीका त्यांनी केली. महाजन म्हणाले, साहित्य पत्रकारितेचा संबंध काही दशकांपासून वाढत आहे.
शोधपत्रकारितेवर आजपर्यंत अनेक सिनेमा, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. जगाशी स्पर्धा करताना भाषेचा बदल स्वीकारावा लागतो, परंतु भाषा जिवंत ठेवून त्याचा प्रचार करणेही पत्रकारितेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात धारूरकर बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत म्हणाले, पत्रकार वस्तुनिष्ठ अनुभव घेत असतो. तो अनुभव शब्दबद्ध करून उत्कृष्ट साहित्य निर्माण केेले जाऊ शकत असल्याचे ते म्हणाले. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले.