आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजीलाच \'धडा\', लाचखोर हेडमास्तरला अडकवले, 6 वीच्या टीसीसाठी मागितले 200 रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यध्यापिका काझी - Divya Marathi
मुख्यध्यापिका काझी
वाळूज- भावाचा सहावी पासचा शाळा सोडल्याचा दाखला ( टी. सी. ) देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेला त्याच शाळेत दहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यानेच शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रंगेहाथ हवाली करून दिले. एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेच्या मुख्याध्यापिकेला अशा प्रकारे ‘धडा’ शिकवण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. मुख्याध्यापिका शमशाद मुनिरोद्दिन काझी ( ५२, डिंबर गल्ली, बेगमपुरा) यांच्याविरुद्ध वाळूज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
 
विद्यार्थाला सहावी पासची टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करत २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिका शमशाद मुनिरोद्दीन काझी (५२,रा. डिंबर गल्ली, बेगमपुरा औरंगाबाद)या लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अलगत सापडल्याची घटना १४ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. याप्रकरणी मुख्याध्यापिकेच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या विरोधात उभा राहणारा संदेशचा भाऊ तक्रारदार प्रेम खिल्लारे हा त्याच जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
 
रांजणगाव शेणपुंजीच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 6वी वर्गात पास झालेल्या संदेश खिल्लारेला टी.सी. हवी होती. संदेश त्याचा मोठा भाऊ प्रेम गुरुवारी टीसी काढण्यासाठी शाळेत गेले. संदेशला रांजणगाव येथील जिजामाता शाळेत प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी पुढील शिक्षण ज्या शाळेत घ्यायचे आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे पत्र, गुणपत्रिकाची साक्षांकित प्रत अर्ज हे सर्व कागदपत्र मुख्याध्यापिका शमशाद काझी यांना दाखवत टीसीची मागणी केली.
 
मुख्याध्यापिकेने टीसीसाठी ५०० रुपयांची मागणी केली. टीसी काढण्यासाठी शासकीय शाळेत पैसे लागत नसल्यामुळे पैसे देण्यास संदेशच्या भावाने नकार दिला. त्यावर पैसे दिल्याशिवाय टीसी मिळणार नाही, असे मुख्याध्यापिकेने संदेशच्या भावाला सांगितले. त्यावर तो भावासह शाळेतून बाहेर पडला. आधी वाळूज पोलिस ठाणे मग एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली. एसीबीच्या या कारवाईत पोलिस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक चौधरी, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, नाईक ब्राम्हंदे, अश्वसिंग होनराव, सम्राटसिंग राजपूत, गोपाल बरंडवाल, सुनील पाटील, महिला पोलिस कर्मचारी शेख आशिया, चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक राजपूत यांनी पार पाडली.

विद्यार्थ्याला जमले, ते तुम्हीही करा
दहावीतील प्रेमने भ्रष्टाचाराविरुद्धची चीड म्हणून आपल्याच मुख्याध्यापिकेला लाचेच्या जाळ्यात अडकवून ‘धडा’ शिकवला. प्रेमला जे करता आले, ते आपणही करू शकतो. तरच भ्रष्टाचार कमी होईल.

पैसे मागताच आधी गाठले वाळूज पोलिस ठाणे
वाळूज पोलिस ठाण्यातून संदेशला घेऊन निघालेल्या प्रेमने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापिकेला लाच स्वरूपात पैसे देण्याची आपली इच्छा नसून त्यासंदर्भात कारवाई होण्याची अपेक्षा त्याने अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर पुढील कारवाई दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे झाली.
 
आधी केले मोबाइलवर चित्रीकरण, शिक्षिकेने मोबाइल हिसकावला, मग गाठले एसीबी कार्यालय
मुख्याध्यापिकेने टीसीसाठी संदेशकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्याची आमची इच्छा नसल्यामुळे गुरुवारी मी, संदेश माझा मित्र असे तिघेजण शाळेत गेलो. मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मित्राने त्याच्या मोबाइलवर टीसी काढण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या सांगण्यानुसार पैशांची मागणी करणाऱ्या शिक्षिकेचे माझ्या संभाषणाचे चित्रीकरण केले. मात्र, हा प्रकार त्या शिक्षिकेच्या लक्षात येताच त्या शिक्षिकेने मोबाइल हिसकावून घेतला आम्हाला पोलिसांत देण्याची धमकी देत शाळेतून हाकलून दिले. त्यानंतर आम्ही वाळूज एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिली. त्यावर त्यांनी आम्हाला एसीबीकडे जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही औरंगाबाद येथील एसीबी पथकाकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई झाली.
- प्रेम खिल्लारे, त्याचशाळेतील दहावीचा विद्यार्थी
 
विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एसीबीने रचला सापळा
शुक्रवारी एसीबीने काझींसाठी सापळा रचला होता. दरम्यान, काझी यांनी पंचांसमक्ष तडजोड करत शेवटी २०० रुपये लाच स्वरूपात घेतले. मुख्याध्यापिका काझी यांना लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तत्काळ ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...