आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priority Of UGC\'s For Safe Environment To Students

सुरक्षेलाच यूजीसीचे प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशनकडून विद्यार्थी सुरक्षेविषयक विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रांगणातील सुरक्षा, तसेच महाविद्यालयीन परिसरातील अनुकूल वातावरणनिर्मितीसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणाचा लाभ तर हाेईलच, पण महाविद्यालयांचीही जबाबदारी कमी हाेणार आहे.
या तरतुदींमध्ये काही प्राथमिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात कॅम्पसमध्ये सीसीटिव्ही असणे, मुख्य इमारतींना मोठ्या संरक्षक भिंती असणे, प्रत्येक मुख्य प्रवेशद्वारांवर कमीत कमी तीन सुरक्षारक्षक असावेत. यासह विद्यार्थी सहज ओळखू येतील, असे स्पष्ट छायाचित्रांसह ठळक शब्दांत वर्णन असलेले ओळखपत्र असावे.
जास्त वरदळ असणाऱ्या ठिकाणांवर जसे कॅन्टिन, नोटीस बोर्ड अशा ठिकाणी विद्यार्थी कल्याण मंडळासह महाविद्यालयात कार्यरत हेल्पलाइनची माहिती असावी. या व्यतिरिक्त महाविद्यालयांत एसओएससारख्या इमर्जंसी सर्व्हिसेस असाव्यात. विद्यार्थ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयीन प्रांगणाच्या जवळपास असणाऱ्या पोलिस ठाण्याशी सातत्याने संपर्कात रहातील, अशा यंत्रणा तयार कराव्या. यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त विद्यार्थी विद्यापीठाशी किंवा त्याच्या महाविद्यालयाशी निगडित एखाद्या शैक्षणिक सहलीसाठी गेले असतील, तर त्या दिवसांत त्यांच्या सुरक्षेच्या तरतुदीदेखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी समूहासोबत कमीत कमी तीन शिक्षक असणे गरजेचे असेल, त्याशिवाय ५० हून अधिक विद्यार्थीसंख्या असल्यास त्यांच्यासोबत एक अनुभवी वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक राहणार आहे. नव्याने करण्यात आलेल्या या काही महत्त्वाच्या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांना तर फायदा होणारच आहे, मात्र महाविद्यालयांचीदेखील मोठी जबाबदारी कमी होणार असल्याचे यूजीसीने िदलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नव्याने केलेल्या काही ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे...
- प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर किमान तीन सुरक्षारक्षक असावेत.
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे ठळक दिसणारे, लगेचच ओळखू येईल असे ओळखपत्र असावे.
- रॅगिंग प्रतिबंध कायद्याची संपूर्ण माहिती विविध माहिती फलकांद्वारे महाविद्यालयात लावण्या यावी. म्हणजे अशा गैरप्रकारांना आळा बसेल.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयात असलेल्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांची सातत्याने गुणवत्ता तपासून घेण्यात यावी.
- कोणत्याही शैक्षणिक सहलींना जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी. त्यांच्यासोबत डॉक्टरांची नेमणूकदेखील करण्यात यावी. तसेच, किमान तीन शिक्षक त्यांच्यासमवेत नेमण्यात यावेत.