आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय शेतीला दिले जाणार प्राधान्य, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील शेतीची सुपीकता टिकवण्याबरोबरच रसायनमुक्त अन्नधान्य, फळभाज्या निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आठही जिल्ह्यांत मान्सून पूर्व सेंद्रिय, गांडूळ खतनिर्मिती व वापर करण्यासाठी कृषी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  

मराठवाड्यात सरासरी ४७ लाख हेक्टर लागवडीयोग्य शेतजमीन आहे. यापैकी केवळ एक टक्का क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते. उर्वरित ९९ टक्के शेती रासायनिक खते, कीटकनाशक, तणनाशकाचा वापर करून पिकवली जाते. परिणामी सेंद्रिय कर्ब घसरला असून हे प्रमाण चिंताजनक आहे. यातून बाहेर पडून शेतीची सुपीकता टिकवण्याबरोबरच रसायनमुक्त दर्जेदार अन्नधान्य निर्मितीसाठी मराठवाड्यात सेंद्रिय शेतीला चालना देणे काळाची गरज बनले आहे. हे ओळखून डॉ. भापकर यांनी पाऊल उचलले आहे.  

मावसाळा येथील शेतकऱ्यांशी हितगुज  
मावसाळा येथील सेंद्रिय खताची विक्रमी निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांशी डॉ. भापकर यांनी  शुक्रवारी हितगुज केले.  रस्त्याच्या आजूबाजूला सेंद्रिय खतांचे मोठे गंज पडलेले पाहून त्यांनी आनंद व्यक्त करत सेंद्रिय खतांबरोबर गवत, केरकचरा एका ठिकाणी करून पंधरा दिवसांत गांडूळ खत तयार करण्याचा सल्ला  शेतकऱ्यांना दिला. तसेच सेंद्रिय खतासोबत सेल्फीही घेतला.  

सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे अनिवार्य
कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागते. यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा बेसुमार वापर केला जातो. परिणामी उत्पादन खर्च वाढतोच शिवाय अतिरिक्त खताच्या मात्रेने सेंद्रिय कर्ब ०.८ टक्के ऐवजी केवळ ०.२ ते ०.४ टक्केच शिल्लक उरला आहे.  शेतीमालात रासायनिक खतांचे अंश जावून विषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा. 
- डॉ. अशोक ढवण, कृषी शास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

हे आहे वास्तव  
औरंगाबाद कृषी विभागात २००८ मध्ये ३९८२८९  मेट्रिक टन खतांचा वापर होत होता. आज ५२९७०९ मेट्रिक टनावर जाऊन पोहोचला आहे. सततचा दुष्काळ असूनही रासायनिक खत वापरात फारसा परिणाम झालेला नाही, हे विशेष.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरिया खत स्वस्त असल्याने त्याचा अतिरिक्त वापर वाढला आहे. दीड लाख मेट्रिक टनावरून तो २ लाख २७ हजार टनावर वापर होऊ लागला आहे. याचे फायदे कमी, धोकेच जास्त झाले आहेत 

सेंद्रिय कर्ब म्हणजे ?   
शेतजमिनीतील सर्व उपयोगी जीवाणूचे खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. सेंद्रिय कर्ब जेवढा अधिक असेल तेवढी जमिनीची पाणी साठवण क्षमता व सुपीकता जास्त असते.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य  
मावसाळ्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी, बैल असे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध विक्रीला विशेष प्राधान्य दिले आहे. सेंद्रिय खताची विक्रमी निर्मिती होते. यातून शेतीला आवश्यक तेवढा वापर करून उर्वरित खत विक्री करून दोन पैसे मिळवतो.  तेच पैसे खरीप पेरणीसाठी कामाला येतात.
-सुखदेव वरकड, शेतकरी, रा. मावसाळा.
बातम्या आणखी आहेत...