आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्याने विद्यापीठात दिली पत्रकारितेची प्रवेश परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शुक्रवारी पत्रकारिता अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिली. पोलिस बंदोबस्तात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात आलेल्या या आगळ्या विद्यार्थ्याला पाहून प्राध्यापकही चक्रावून गेले. सुनील नागनाथ गिते नावाचा हा कैदी पैठणच्या खुल्या कारागृहातून आला होता.

वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, दीड महिन्यापूर्वी गिते याचा अर्ज माझ्याकडे सादर झाला तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटले. अधिक चौकशी केल्यावर त्याने शिक्षेचा कालावधी संपल्यावर समाजाभिमुख लिखाण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. 32 वर्षे वय असलेल्या सुनीलने आज सुमारे 300 विद्यार्थ्यांसोबत दुपारी तीन ते पाच या वेळेत 70 गुणांची लेखी परीक्षा दिली. शनिवारी होणार्‍या ग्रुप डिस्कशनमध्ये तो सहभागी होणार आहे. त्यानंतर त्याची दहा गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. कैद्याने पत्रकारितेची परीक्षा देण्याची ही विद्यापीठातील पहिलीच घटना असावी.

बार्शी तालुक्यातील वैराग येथील रहिवासी असलेल्या गितेने बारा वर्षांपूर्वी मित्राचे अपहरण करून त्याचा खून केला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.