आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithiviraj Chavan News In Marathi, Chief Minister, Congress, Divya Marathi

औरंगाबादचा उमेदवार टाळून मुख्यमंत्र्यांनी बैठक गुंडाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस पक्षाची तत्त्वे पाळली नाहीत तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याप्रमाणेच बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत दिला. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेली औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही.


प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक गुरुवारी सागर लॉन्स येथे झाली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करतील, अशी अपेक्षा होती.
एकदाचे जाहीर कराच : जिल्हाध्यक्ष केशवराव औताडेंपासून ते कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही उमेदवार एकदाचा जाहीर करा, अशी मागणी केली. कोठे तरी बोट ठेवायचे आहे, एकदा ठेवाच, असे ते म्हणाले.


औरंगाबादेत भलत्याच भानगडी : विखे
औरंगाबादेत भलत्याच भानगडी चालतात. कोणी बोलते एक अन् म्हणते एक असे होते. तेव्हा विलंब न करता उमेदवारी जाहीर करा, असे विखे म्हणाले.


दर्डा, झांबड, देशमुख यांच्याकडून मदत
गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी दर्डांनी त्यांचे एक वर्षाचे मानधन (10 लाख) मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली. आमदार सुभाष झांबड, मोहन देशमुख यांनी प्रत्येकी 1 लाखाचे धनादेश मुख्यमंत्र्यांना दिले.
खैरेंनी शहराची वाट लावली : खासदार चंद्रकांत खैरे यांनी गेल्या 15 वर्षांत औरंगाबाद शहराची वाट लावल्याचा आरोप दर्डा यांनी केला. खैरे यांच्यामुळेच समांतर जलवाहिनी होऊ शकली नाही, भूमिगत गटार योजनाही टक्केवारीमुळे रखडल्याचे ते म्हणाले.


..आणि उमेदवाराचे संकेत
दोन-तीन दिवसांत औरंगाबादचा उमेदवार ठरेल. उमेदवार येथेच व्यासपीठावर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तमसिंग पवार, नितीन पाटील, राजेंद्र दर्डा व्यासपीठावर होते. तिघांपैकी कोण? याची चर्चा सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांनी आभाराची जबाबदारी नितीन पाटलांवर सोपवली आणि पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत मिळाले, असा सूर उमटला.


औताडे यांना सुप्रियांचा सल्ला
बायकोवर राग काढा, बाहेर रागावू नका
खासदार सुप्रिया सुळे यांनी जालन्याचे उमेदवार विलास औताडे यांना काही टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या, मतदान होईपर्यंत सर्व राग बायकोवर काढा. बाहेर कोणावरही रागवू नका. दिसेल त्याला हात जोडा. त्यावर सुप्रियांच्या टिप्स पाळल्या तर विलासराव खासदार झालेच म्हणून समजा, असा उल्लेख नंतरच्या वक्त्यांनी केला.