आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithiviraj Chavan News In Marathi, Hailstorm, Divya Marathi, Chief Minister

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्रिगणांची गारपीटग्रस्त गावांना भेट, शेतकर्‍यांचे सांत्वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळेगाव/उंडणगाव - राज्यात 26 जिल्ह्यांत गारपीट झाली असून 22 जणांचा यात मृत्यू झाला आहे. अनेक जनावरेही या घटनेत मृत्युमुखी पडली. सिल्लोड तालुक्यात जीवितहानी झाली नसली तरी राज्यात सर्वाधिक गारपीट सिल्लोड तालुक्यात झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुक्याच्या दौर्‍यानिमित्त कबूल केले.
गारपिटीमुळे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन खंबीरपणे उभे आहे. नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले असल्याने यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. वेळ पडल्यास राज्य शासन कर्ज काढण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्‍यांशी बोलताना स्पष्ट केले.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडणगाव, धोत्रा, खंडाळा भागामध्ये 7 व 8 मार्च रोजी गारपीट होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांसह या दौर्‍यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम यांच्यासह आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, प्रभाकर पालोदकर, माजी आमदार नितीन पाटील, नामदेवराव पवार, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेशराव दौड, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर सत्तार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दुर्गाबाई पवार, पंचायत समिती सभापती रेखाताई जगताप, जि.प.सदस्या कल्पनाताई लोखंडे, पंचायत समिती सदस्य विक्रांत दौड आदींची उपस्थिती होती.
या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या भागात अभूतपूर्व गारपीट झाल्याने संपूर्ण पिके आडवी झाली आहेत. यात्रा उद्ध्वस्त झाली. अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्याला करावयाचा आहे. या भागातील भीषण परिस्थिती पाहता येथे त्वरित अन्नधान्य वाटपाच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचे बंधन असले तरी यातून लवकर मार्ग काढून शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल. यासाठी उद्या कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, गारपीटग्रस्तांना मदत करण्यासाठी आचारसंहितेचे बंधन आहे. मात्र यातून मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला मदत मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या भागामध्ये अन्नधान्याची मदत तत्काळ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सिल्लोड तालुक्यात झाले आहे. शेतातील पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र घरात अन्नधान्यही राहिले नाही. यासाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्वरित अन्नधान्य वाटप करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पंचनामा दोन दिवसांत करण्यात येणार असल्याने या घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्वांनी पंचनामा करून घेण्याचे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी या वेळी केले.
गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, खंडाळा, बोदवड, उंडणगाव या भागामध्ये गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे 100 टक्के नुकसान झाले. सोबत धोत्रा यात्रा, शाळा, वीटभट्टय़ा, पानमळे अशा सर्वांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने मदत द्यावी व शेतकर्‍यांना नुकसानापोटी एकरी 30 हजार रुपये मदत मिळावी, अशी विनंती आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. या वेळी विजय दौड, देविदास लोखंडे उपस्थित होते.
सर्वांना मदत देण्याचे आश्वासन
सिल्लोड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे धोत्रा येथील यात्रेतील दुकाने, चित्रपट थिएटर व पानमळे यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या सर्वांचा दोन दिवसात पंचनामा केला जाईल व सर्वांना मदत दिली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकर्‍यांना अश्रू अनावर
सिल्लोड तालुक्यातील खंडाळा शिवारातील बसैये यांच्या शेतामध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. नुकसानग्रस्त विविध भागांची त्यांनी पाहणी केली. खंडाळा शिवारातील शेतकरी महादू तुकाराम इंगळे, मनीष बसैये, सुमनबाई इंगळे, मंगलाबाई इंगळे, रुक्मिणबाई इंगळे, अंजनाबाई इंगळे, किसन इंगळे, पंडित इंगळे, शेषराव बनकर यासह येथील शेतकर्‍यांनी गारपिटीच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगितली. हे सांगत असताना सर्वांना अश्रू अनावर झाले होते.