आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 मंत्री भ्रष्ट असताना फक्त खडसेंची चौकशी, पृथ्‍वीराज चव्हाण यांचा भाजपवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - राज्य सरकारमधील १४ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना केवळ एकनाथ खडसेंची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली खुर्ची वाचविण्यासाठी सुरू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महालगाव येथे बोलताना केला. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.  
 
आमदार सुभाष झांबड, आमदार भाऊसाहेब पा.चिकटगावकर, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. 
 
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारमधील शिक्षणमंत्र्यांची बोगस पदवी,चिक्की घोटाळा तसेच एका बहादर मंत्र्याने तीनशे पंधरा कोटींच्या रस्त्याच्या कामाची तीन लाखांच्या आत तुकडे पाडून   कलंकित कारभार केल्याचा धडक आरोप मंत्र्याचे नाव न घेता केला. मात्र मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्याची चौकशी करण्याऐवजी क्लीन चिट देण्याचे काम करत असल्यामुळे इतके भ्रष्टाचारी सरकार कुठे पाहिले नाही, असा टोला त्यांनी फडणवीस सरकारला लगावला. जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद राज्य सरकारवर पडणार आहे. युती सरकार हे जाहीरातबाजीचे आहे. लोकाची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले आहे.
 
शेतकऱ्यांना किती फसवायचे यालाही मर्यादा आहे. शेतकऱ्याना भीक, दान नको तर घामाचा मोबदला पहिजे, पण सरकार नुसत्या गप्पा मारत आहे. मोदींनी नोटबंदीचा निर्णय परकीय बँकेच्या दबाबाखाली आणि त्यांच्या जवळच्या मंडळीचे काळे धन उजळून देण्यासाठी केल्याचा धडक आरोप चव्हाण यांनी करत या कारस्थानाची खुली चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. 
 
नेते गोंधळले
महालगाव येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहीर सभेचे   सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जाहीर सभेसाठी टाकण्यात आलेल्या मांडवात श्रोत्यांनी येऊन बसण्यासाठी व्यासपीठावरून सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने नामी शक्कल लढवत माजी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्याची जाहीर वर्दी दिली तसेच संयोजकांनी फटाक्याची अातषबाजी केली. दरम्यान माजी सी.एम.चे एका पतसंस्थेच्या इमारतीत बसून लोकेशनवर असलेले येथील स्थानिक नेते गोंधळून गेले होते. चव्हाण सभास्थळी आल्याचे गाजावाजा सुरू झाल्यामुळे त्यांनी इमारती बाहेर पडून चव्हाण खरेच आले का?  यांची पाहणी केली.
 
मेक इन इंडियाच्या माध्यमातून तरुणांची केली फसवणूक
सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून ३० लाख नवे रोजगार निर्माण होऊन बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल, अशी घोषणा सरकारने केली मात्र आजपर्यंत मेक इन इंडियात एक रुपयाचीही गुंतवणूक झालीच नाही. त्यामुळे या सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देऊ असे म्हणून फसवले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गणोरी येथे आयोजित प्रचार सभेत केले.
 
गणोरी येथे माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ.डॉ.कल्याण काळे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास औताडे, देवगिरीचे चेअरमन जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष सुदाम मते, औरंगाबाद तालुकाध्यक्ष काकासाहेब कोळगे, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, अजगर पटेल, राहुल डकले आदींची उपस्थिती होती. आभार गणेश तांदळे यांनी मानले. या वेळी इब्राहिम पठाण, सुभाष गायकवाड, बाबासाहेब तांदळे, मुद्दसर पटेल  यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...