आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाचा अंत पाहू नका: चव्हाण, तीन दिवसीय ‘मराठा महाएक्स्पो’चे उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरक्षणासाठी मराठा समाजाचा संयम संपत चालला आहे. त्यांच्या सहनशीलतेचा सरकारने विरोधकांनी अंत पाहू नये. कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी मार्ग, तरतुदी आहेत. त्यावर दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असा सूचनावजा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा महाएक्स्पो कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दिला. 
 
शिवाई मराठा महिला मंडळ मराठा बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राज्यस्तरीय मराठा बिझनेस महाएक्स्पो २०१७ चे उद्घाटन गुरुवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हस्ते झाले. अध्यक्षस्थानी चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अतुल सावे तसेच डॉ. कल्याण काळे, जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, मंडळाच्या अध्यक्षा नीती देशमुख, उद्योजक अनुश्री मुळे, वैशाली देशमुख, पुष्पा काळे, राजेंद्र देशमुख, रंजना देशमुख आदी उपस्थित होते. 
 
चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात पुरेशा पावसाअभावी शेती पिकत नाही. दुसरीकडे नोकरी मिळत नाही, अशा संकटात सापडलेले तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपणाचे स्वत: अभ्यास केला आहे. आमच्या सरकारने आरक्षण उपसमिती नेमली होती. माझ्या काळात ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत. त्यावर मार्गही काढता येतो. त्यासाठी आता प्रयत्न व्हायला हवेत. मुख्यमंत्री हो, हो म्हणतात. मात्र, पुढे काहीच होत नाही. सत्ताधारी, विरोधक इतर आमदारांनी एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. मराठा समाजाने आजवर शांततेत मोर्चे काढले. याची कुठे तरी दखल घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रदीप सोळुंके यांनी केले, तर आभार बालाजी शिंदे यांनी मानले. 
 
कृषीमूल्य आयोगाला कायदेशीर दर्जा मिळावा : कृषीमूल्य आयोग स्थापून काहीच होणार नाही. सरकारचा तुरीच्या उत्पादनाचा अंदाज चुकला. शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही. याचा विचार करून प्रथम कृषी मूल्य आयोगाला कायदेशीर दर्जा मिळावा. कृषी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
वैज्ञानिक क्रांतीमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या : देशातवैज्ञानिक क्रांती झाल्याने रोबोट, संगणक आदी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक व्यक्ती दहा ते पंधरा लोकांचे काम करत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. आता तरुणांनी कृषीवर आधारित उद्योग उभारावेत. यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा समाजापुढे ठेवून त्यांची मानसिकता बदला. त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 
 
दळणवळणाची साधने हवीत : मराठा समाज म्हणजे राजकारण हा समज आता दूर करा. राजकारण हा काही उद्योग नाही. त्यामुळे आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक दायित्व म्हणून राजकारणास प्राधान्य द्या. उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी महानगरात दळणवळणाची मुबलक साधने हवीत. अन्यथा उद्योजक येत नाहीत. मुंबई, पुण्यात जागा देण्याची मागणी करतात. औरंगाबादेतील डीएमआयसी, जालन्याला ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्ग हे कृषी, उद्योग-व्यवसाय, पर्यटनाला चालना देतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...