आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Banks Getting Benefits From Public Sector Banks

सरकारी पैशांवर खासगी बँका होताहेत मालामाल, संसदीय समितीकडे गाऱ्हाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
औरंगाबाद - विविध सरकारी योजनांसाठीचेे सहा हजार कोटी रुपये सरकारी बँकांऐवजी थेट तीन खासगी बँकांकडे वळवले जातात. त्यामुळे सरकारी ग्रामीण बँका डबघाईस आल्या अाहेत, असा आक्रोश केंद्रीय संसदीय समितीसमोर सरकारी बँकांच्या प्रतिनिधींनी सोमवारी केला.
सूत्रांनुसार गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसची सत्ता असतानाचे दोन माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोइली व दिग्विजय सिंह या समितीत आहेत. खासदार चंद्रकांत खैरे हेही समितीचे सदस्य आहेत. सोमवारी सकाळी हॉटेल ताज येथे या समितीने मराठवाड्यातील एकूणच परिस्थिती व बँकांकडून वित्त पुरवठा व शेतकऱ्यांना केल्या जात असलेल्या कृषी पतपुरवठ्याचा आढावा घेतला.

खासगी बँका मालामाल...
सरकारी बँकांच्या प्रतिनिधींनी आयसीआयसीआय, अॅक्सिस, एचडीएफसी बँकांची नावे घेत आक्षेप नोंदवले. ते म्हणाले, प्रत्येक सरकारी योजनेच्या नावा़खाली लाभार्थीच्या नावे दिले जाणारे ६००० कोटी रुपये या बँकांकडे वळवले जातात. हा असमतोल ग्रामीण भागातील सरकारी बँकांच्या मुळावर आला आहे. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवायची असेल तर हे सहा हजार कोटी रुपये खासगी बँकांकडून काढून सरकारी बँकांच्या खात्यात ठेवावेत. जेणेकरून शेतकऱ्यांसह सरकारी बँकांचीही पत सुधारेल.

राज्यातील ८५ टक्के बँकिंग क्षेत्र एकट्या मुंबई व ठाणे परिसरात केंद्रित झाल्याचा आरोपही काही सदस्यांनी समितीसमोर केला. या वेळी मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीची करुण कहाणी संसदीय समितीसमोर मांडली. आपल्या व्यथा मांडताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.
खासगी बँकांमध्ये शेतकऱ्यांना नो एंट्री
सरकारी बँकेचे प्रतिनिधी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या समितीसमोर सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना आपल्याशा वाटतात. तेथे शेतकरी बिनदिक्कत जाऊ-येऊ शकतो. तेथे त्याला मदतही केली जाते. अनेक शेतकरी अशिक्षित असतात, त्यांना मार्गदर्शनही मिळते. मात्र, पागोट्यावाला शेतकरी दिसताच खासगी बँकेच्या पायरीवरच अडवले जाते. आत जाण्याचा प्रश्नच येत नाही. एखादा आत गेला तर त्याच्याकडे लक्षही दिले जात नाही. मदत फार दूरची गोष्ट राहिली.