आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बसवर जीपीएसची नजर हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सणवार आणि सुट्यांच्या काळात मनमानी पद्धतीने भाडेवाढ करू नका. महिला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करा. बसमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करून मालक, व्यवस्थापकाचा मोबाइल क्रमांक लावावा, अशा विविध सूचना "दिव्य मराठी'तर्फे आयोजित बैठकीत प्रवासी, मान्यवरांनी केल्या. बस मालकांच्या संघटनेनेही यातील बहुतांशी मागण्या तत्काळ मान्य करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. तर गरज पडल्यास जनहित याचिका दाखल करण्याची तयारी विधिज्ञांनी दाखवली.
दहा दिवसांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस खराब झाल्यामुळे मध्यरात्री अहमदनगर जवळ उतरवण्यात आले होते. यात सात मुलींचा समावेश होता. या घटनेमुळे खासगी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी मंगळवारी दिव्य मराठी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात विभागीय परिवहन अधिकारी गोविंद सैंदाने, औरंगाबाद बस ओनर्स अंॅड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे सचिव पुष्कर लुले व उपाध्यक्ष सिराज कादर मोहंमद, राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय सल्लागार समितीचे शासकीय सदस्य व निवृत्त वरिष्ठ सहायक सुभाष देवकर, ग्राहक मंचाचे अभ्यासक अॅड. विठ्ठल चाटे, अॅड.रणजित शेंडगे, जागृती मंचच्या अध्यक्षा प्रा.भारती भांडेकर, ज्येष्ठ नागरिक मधुकर (अण्णा) वैद्य तसेच नियमितपणे खासगी बसने प्रवास करणारे प्रवासी प्राजक्ता मुर्कीकर, अंजू मुळे, ज्योती मचाले, ममता शर्मा, आरती पवार, आशा तेली आणि रंजना तुळशी यांनी सहभाग नोंदवला.
घडलेल्या प्रकाराचा निषेध
मुलींना बसमधून उतरवून देण्याच्या प्रकाराचा या वेळी सर्वांनीच निषेध केला. मात्र, दरवेळेस असे होत नाही. एका घटनेवरून संपूर्ण खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना बदनाम करणे चुकीचे असल्याचे रंजना तुळशी यांनी सांगितले. बसमालक संघटनेचे सिराज कादर मोहंमद म्हणाले की, रस्त्यात बस खराब झाली तर मागून येणाऱ्या वाहनात या प्रवाशांची सोय करून दिली जाते. आम्हाला एकमेकांची गरज पडतेच. त्यामुळे कोणीच मदतीला नाही म्हणत नाही. तरी समस्या नाही सुटली तर दोन तासाच्या आत नवीन बस त्या ठिकाणी पाठवली जाते. देवकर म्हणाले की, एसटीत असा प्रसंग आलाच तर मागून येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना सामावून घेतले जाते. शेवटच्या प्रवाशाची सोय लागेपर्यंत ड्रायव्हर व कंडक्टर जागा सोडत नाहीत.
बैठकीत पुढे आलेल्या मागण्या
*खासगी बस भाड्यावर नियंत्रणासाठी एक समिती स्थापन करावी.
*सर्व बस कंपन्यांची केंद्रीय हेल्पलाइन सुरू करावी.
*तिकिटावर बसमालक, कार्यालय, ड्रायव्हर, क्लिनर, एजंटाचे फोन नंबर असावेत.
*तिकीट बुकिंग केलेली बस कोणत्या कंपनीची आहे, याचा तपशील तिकिटावर असावा.
*बस मालक, महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक, परवाना क्रमांक आदी माहिती बसच्या दर्शनी भागात लावावेत. यामुळे अडचणीच्या प्रसंगी त्यांना संपर्क करणे शक्य होईल.
*बस कोठे थांबेल याची माहिती प्रवाशांना दिली जावी.
*महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आहेत, अशाच हॉटेलमध्ये बस थांबवावी.
*बसची नियमितपणे सर्व्हिसिंग केली जावी. यामुळे बस खराब होण्याचे प्रमाण घटेल.
*महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी क्लिनर व ड्रायव्हरवर असावी.
*ड्रायव्हर, िक्लनर मधधुंद नाही ना? याची कार्यालयातच खातरजमा केली पाहिजे.
*प्रवाशांच्या तक्रारींची दखल तत्काळ मालकाने घ्यावी.
*हद्दीच्या वादात न पडता प्रवाशांच्या तक्रारी प्रत्येक पोलिस ठाण्यांनी घ्याव्यात.
*काही जागा फक्त महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवाव्यात. महिला प्रवाशाच्या बाजूला महिलांनाच बसू द्यावे.
*ड्रायव्हरने मोबाइलवर बोलत वाहन चालवू नये.
*गाडीत टेप, व्हिडिओ लावू नये.
*बसमध्ये जागेशिवाय एकही प्रवासी घेऊ नये.
*बुकिंग एजंट, ड्रायव्हर, क्लिनरला सौजन्यपूर्ण वागणुकीचे प्रशिक्षण द्यावे.
*बसवर वॉच ठेवण्यासाठी कंपनीने जीपीएस यंत्रणा लावावी. ही यंत्रणा बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी जोडावी. यामुळे बसमालकाला बसचे लोकेशन, एखाद्या अपघाताची माहिती आदी घरबसल्या समजू शकेल.