आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडसर - खासगी विमानसेवा गैरसोयीची ; अवेळी सेवांसह सातत्याने बदल ठरतोय त्रासदायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासगी विमान कंपन्यांकडून विमानाच्या वेळा सातत्याने बदलण्यात येत असल्यामुळे औरंगाबादकर त्रस्त झाले आहेत. परिणामी, काम आटोपून एका दिवसात मुंबई-दिल्लीला परतणे अशक्य बनल्याने या विमानसेवेबद्दल प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.
व्यापारी, उद्योजक, अधिकारी, राजकीय नेते, पर्यटक व इतरांना मुंबई, दिल्ली, हैदराबादसारख्या महानगरांत एका दिवसात काम करून परतणे शक्य व्हावे, यासाठी औरंगाबादहून विविध खासगी कंपन्यांच्या विमानसेवा सुरू आहेत. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत बहुतांश विमानसेवा सोयीच्या कमी व गैरसोयीच्या अधिक ठरत आहेत, अशी तक्रार व्यापारी व उद्योग क्षेत्रातील प्रवाशांची आहे. जेट एअरवेजच्या औरंगाबाद-मुंबई विमानाच्या वेळेत महिनाभरात बदल झाला आहे. या विमानाची वेळ पूर्वी सकाळी 8.25 ही होती, आता ती सकाळी 9.45 करण्यात आली आहे. हे विमान 10.30 वाजेपर्यंत सांताक्रुझ विमानतळावर पोहोचते. तेथून व्हीटीला जाईपर्यंत दुपारचे 12 वाजून जातात. वाशी, खारघरसारख्या ठिकाणी जाण्यासाठीही दीड-दोन तास लागतात. म्हणजेच अर्धा दिवस प्रवासात निघून जातो. कामासाठी पूर्ण दिवस मिळत नाही. तसेच परतीचे औरंगाबाद विमान सायंकाळी सात वाजता आहे. ते पकडण्यासाठी किमान दोन तास आधी निघावे लागते. त्यामुळे कामासाठी अवघे पाच तास मिळतात. या गैरसोयीच्या वेळेमुळे अलीकडे विमानाने जाणारी मंडळी सकाळच्या जनशताब्दी रेल्वेला पसंती देत असल्याचे दिसते. या रेल्वेनेही व्हीटीला पोहोचण्यासाठी दुपारचे 12 वाजतात हे खरे असले तरी परतीच्या प्रवासासाठी देवगिरी एक्स्प्रेस रात्री 9 च्या सुमारास आहे. भाड्याचा विचार केला तर रेल्वेने अध्र्या खर्चातच मुंबईला जाऊन-येऊन करता येते. गैरसोयीच्या वेळेमुळेच जेट एअरवेजची प्रवासी संख्या 25 टक्क्यांनी घटली आहे. अर्थात, जागतिक मंदी व रोडावलेली पर्यटकांची संख्याही त्यासाठी कारणीभूत ठरली आहे, असे ‘वेलवर्थ ट्रॅव्हल्स’चे आशिष हौजवाला यांनी सांगितले.
सीएमआयए करणार पाठपुरावा - ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर’ (सीएमआयए)तर्फे खासगी विमानसेवेसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. संघटना या प्रकरणी नागरी उड्डयण मंत्रालयाकडे पाठपुरावा क रणार आहे. सातत्याने बदलणार्‍या विमानाच्या वेळा, कमी कालावधीच्या सूचनेत अचानकपणे बदल करणे, यामुळे दौर्‍याचे नियोजन करता येत नाही. विनाकारण हॉटेल व खाण्यापिण्याचा खर्च वाढतो. या सर्व बाबीच्या संदर्भात मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे समजते.
जेट एअरवेजची मोनोपॉली - मुंबईला सकाळी जाण्यासाठी खासगी जेट एअरवेजची एकमेव विमानसेवा आहे. सरकारी एअर इंडियाची विमानसेवा सायंकाळी 5.10 वाजता असल्यामुळे औरंगाबादकरांना या वेळेला जाऊन फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच जेट एअरवेजची मोनोपॉली निर्माण झाली आहे.
पूर्वीसारख्या वेळा करू - विमानांच्या उपलब्धतेनुसार विमानसेवेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. मात्र लवकरच पूर्वीप्रमाणे वेळ करण्याचा प्रयत्न असेल. अहमद जलील, स्टेशन मॅनेजर, जेट एअरवेज.
विमानसेवाआणखी अडचण - विमानाच्या वेळा उद्योजकांच्या दृष्टीने उपयुक्त नाहीत. सध्याच्या टाइमटेबलप्रमाणे विचार करता मुंबईला काम आटोपून एका दिवसात परत येणे शक्य नाही. ही सेवा उपयोगी नसून आणखीनच अडचणी आहे. फुलचंद जैन, उद्योजक.