औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, पिअर्सन इंग्लिश स्कूल आणि युनिव्हर्सल हायस्कूलवर गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई झाली असली तरी या शाळा मात्र नियमित सुरू आहेत. जि. प. प्रशासनाच्या कारवाईनंतर काही पालकांनी फोन करून शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसून आठ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना रेव्हरडेलमध्ये सामावून घेतले जाईल, असे आर. जे. इंटरनॅशनल स्कूलचे सचिव पी. व्ही. सोळुंके यांनी सांगितले.
‘सीबीएसई’शी संलग्नतेच्या विषयावरून रविवारी पिअर्सन इंग्लिश स्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल आणि युनिव्हर्सल हायस्कूलच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रविवारी आर. जे. इंटरनॅशनल स्कूलला ‘दिव्य मराठी’च्या चमूने भेट दिली असता शाळा नियमितपणे सुरू होती. शाळेत पहिलीच्या वर्गात 41, दुसरीत 13, तिसरीच्या वर्गात 09, चौथीत 11 आणि पाचवीच्या वर्गात 10 विद्यार्थी आहेत. शाळांवर गुन्हे दाखल केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यामुळे काही पालकांनी शाळा प्रशासनाला फोनवरून विचारणा देखील केली. मात्र इतर शाळांत विद्यार्थी सामावून घेणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
शाळांची कागदपत्रे जप्त
सीबीएसईची मान्यता नसताना विद्यार्थ्यांना सशुल्क प्रवेश देणार्या तीन शाळांची सोमवारी पोलिसांनी कसून चौकशी केली. नक्षत्रवाडी येथील पिअर्सन आणि सातारा परिसरातील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलने मान्यतेसाठी सादर केलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. पिअर्सनचे संस्थाचालक सुरेश रुणवाल, मुख्याध्यापिका सायली खटावकर आणि आर. जे. इंटरनॅशनलचे संस्थाचालक राघवेंद्र जोशी, मुख्याध्यापिका सरिता संजय रडते आणि परमेश्वर व्यंकट आदी सहा जणांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, तर युनिव्हर्सल शाळेचे विजय दुतोंडे, श्वेता वकील, वृषाली व जिजस सुधीर लाल यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पिअर्सन शाळेत तपासी जमादार सुदाम दाभाडे यांनी सकाळी नऊ वाजता जाऊन मान्यतेसाठी दिल्लीत दाखल केलेली कागदपत्रे, न्यास नोंदणी प्रमाणपत्रे जप्त केली. आर. जे. इंटरनॅशनलमध्ये तपासी अंमलदार शेषराव चव्हाण यांनीही नोंदणी प्रमाणपत्र जप्त केले आहेत. पिअर्सनच्या मुख्याध्यापिका सुटीवर असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला नाही, तर युनिव्हर्सलचे व्यवस्थापन मंडळ मुुंबईत असल्यामुळे सोमवारी काहीच हालचाल करता आली नसल्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ यांनी म्हटले आहे.
कोण काय म्हणाले?
कायदेशीर सल्ला मागवणार
४संस्थेच्या वतीने कायदेशीर सल्ला मागवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. तसे जिल्हा परिषदेलाही आम्ही पत्र दिले आहे. त्यामुळे आठ दिवसांत मुलांना रेव्हरडेलसह इतर शाळांत समाविष्ट केले जाईल.
- पी. व्ही. सोळुंके, सचिव, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल
कागदपत्रे तपासणार
17 शाळांपैकी सात शाळा पूर्वप्राथमिक आहेत, तर सात शाळांकडून कागदपत्रे मागवण्यात येत आहेत. आरटीईचे निकष या शााळा पूर्ण करतात की नाही, याचीही तपासणी करण्यात येत आहे.
- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी जि. प.
आमचे समाधान झाले
पेपरमध्ये बातम्या वाचल्या आहेत. माझा मुलगा दुसर्या वर्गात आहे. आम्ही शाळेच्या प्राचार्यांसोबत बोललो आहोत. त्यांनी आमचे समाधान केले. मात्र गुन्हे दाखल झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.
- आशा लाड, पालक