आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संततुकाराम नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून ग्राहक आणि भाड्याने घेणाऱ्यांना मोबदल्याच्या प्रमाणात सेवा मिळत नाही. तसेच महानगरपालिकेकडून त्याची दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
सकाळी तुपे यांच्या दालनात शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी एन- सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृह खासगी तत्त्वावर चालवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी नाट्यगृहातील असुविधांचा पाढा वाचला.

तुपे यांनीही मनपाकडून चांगली सुविधा देण्यात येत नसल्याने याचे खासगीकरण करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले. त्यानंतर जवाहर कॉलनीतील पाच वॉर्डांतील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारीबाबत तुपे यांनी विचारणा केली असता या भागात ग्रॅव्हिटी पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ही समस्या असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच त्रिमूर्ती चौकातील भाजी मंडई परिसरात पाण्याची टाकी उभारण्यासाठी प्रशासनाने पाहणी करण्याचे आदेशही दिले. औषधी भवन आणि भानुदासनगरमधील नाल्यावरच्या अतिक्रमणाबाबत लवकर निर्णय घेऊन कारवाई करण्याचे स्पष्ट केले.

कर लावताना हेतू तपासा
शैक्षणिक संस्थांना कर लावण्यापूर्वी संस्थांचा हेतू आणि आकारण्यात येणारी फी लक्षात घेऊनच कर लावा. एन- १२ येथील उद्यानात झाडे जगवण्यासाठी पाणीपुरवठा करण्याचे आदेशही तुपे यांनी दिले. या वेळी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.