आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षमय जीवन: बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रियाने केली अपंगत्वावर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जन्मत:च शरीराने अपंग झालेल्या अाणि वडिलांचे छत्र हरवलेल्या प्रिया संकाये या विद्यार्थिनीने जिद्द व प्रेरणेतून बुद्धिमतेने अपंगत्वावर मात करण्याचा संकल्प करून संघर्षमय जीवनाला सुरुवात केली आहे. बारावीत ५२ टक्के गुण मिळवून तिने सर्वांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मात्र, घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्याने ध्येयपूर्तीसाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत विजय संकाये यांची नंदुरबार येथे बदली झाल्यानंतर कुटुंब व समाजाचा विरोध पत्करून आणि जातिभेद न मानता त्यांनी आदिवासी तरुणी मीनाक्षीसोबत प्रेमविवाह केला. त्यांच्या प्रेमवेलीवर प्रियाच्या रूपाने फूल उमलले. पण प्रियाच्या हातापायांची वाढ नीट होत नव्हती. वडील विजय यांचे नोकरीत मन रमेना म्हणून त्यांनी राजीनामा देऊन व्यवसाय सुरू केला. आर्थिक अडचणही नव्हती. मात्र प्रियाचे अपंगत्व त्यांच्या मनाला खूप बोचत होते. विविध हॉस्पिटल, वैद्यांना दाखवले, खूप प्रयत्न केले; पण उपयोग झाला नाही. कारण प्रिया जन्मत:च अपंग होती. ती रांगली नाही की उठूनही बसू शकली नाही. तिला बोलता येते. कुणी काही बोलले तर समजतही होते. कारण तिची बुद्धी तल्लख आहे. मात्र, २०११ मध्ये वडील विजय यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर मात्र संकाये कुटुंबावर दु:खाचा पहाडच कोसळला. उदरनिर्वाहासाठी आई व छोट्या भावाकडे मजुरीशिवाय इतर कोणताच पर्याय उरला नाही.

समाज व देशासाठी काही करण्याची जिद्द
अशाही स्थितीत जगायचे म्हणून जगत नाही तर चांगले शिकून कुटुंब, समाज व देशासाठी काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने प्रिया वाटचाल करत आहे. याच प्रेरणेतून तिने बारावीत यश संपादन केल्याचे ती अभिमानाने सांगते. पुढे पदवीधर होऊन शिक्षिका व्हायचे आहे. यासाठी तिला मदतीची गरज असल्याचे एमसीईडीचे कार्यकारी संचालक डी. व्ही. मुळे यांनी सांगितले.

अनेकांचा मदतीचा हात
बजाज हॉस्पिटलचे डॉ. एस. व्ही. संतापुरे, एमजीएमचे डॉ. विरांची वैद्य यांनी प्रियाच्या उपचारासाठी मदत केली. मुकुल मंदिरचे मुख्याध्यापक जयंत चौधरी यांनी प्रियाचे शिक्षण सुकर होण्यासाठी मदत केली आहे. मीनाक्षी मोलमजुरी करून प्रिया व सिद्धांत यांचा सांभाळ करत आहेत. सिद्धांत छत्रपती महाविद्यालयात एमसीव्हीसीचे शिक्षण घेत आहे. तो वृत्तपत्र वाटण्याचे काम करतो.

सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत
मुलांना शिकवण्यासाठी आईवडील कष्ट घेतात. एवढे करूनही मुलांचे शिक्षण घेण्याकडे दुर्लक्ष असते. पण दुसरीकडे शिक्षण कसे घ्यावे या विवंचनेत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मदत न मिळाल्यामुळे ते खचून जातात. हाेतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत.
मीनाक्षी संकाये
बातम्या आणखी आहेत...