आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळक्या छताखाली केले जातात रुग्णांवर उपचार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या वाळूज गावासह परिसराचे आरोग्य सध्या वार्‍यावर असून येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील दोनच कर्मचार्‍यांवर 45 हजार लोकांच्या आरोग्याचा भार टाकण्यात आला आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या उपकेंद्रात रुग्ण तपासणी केली जात आहे. या ठिकाणी वीज व पिण्याच्या पाण्याची सुविधाही नाही. उपकेंद्रापर्यंत चारचाकी वाहनही जात नाही. उपकेंद्राचे छत अल्प पावसातही झिरपत असून तेथे औषधी ठेवण्यासही जागा नाही. आरोग्य उपकेंद्राचेच आरोग्य धोक्यात असून तेथे रुग्णांवर कसे उपचार होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाळूज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येते. वाळूजसह शिवराई, लांझी, पिंपरखेडा व नारायणपूर अशा पाच गावांतील रुग्णांचा भार याच केंद्रावर आहे. त्रिगुणी, गोवर, कावीळ, बीसीजी, धनुर्वात यांचे लसीकरण व प्राथमिक उपचार येथे केले जातात. कुपोषित मुले, क्षयरोग, कष्ठरोगांची तपासणी व उपचारांची येथे व्यवस्था आहे. यंत्र सामग्री व वैद्यकीय कर्मचारी नसल्याने गरोदर महिलांची मात्र येथे तपासणी केली जात नाही. आठवड्यातून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे चार दिवस सकाळी आठ ते दुपारी 12 च्या वाजेच्या दरम्यान बालकांना लसीकरण केले जाते. अनेकदा डोस संपल्याने आरोग्य उपकेंद्र बंद करावे लागते.

इमारत 50 वर्षांपूर्वीची जुनी : वाळूजच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत सुमारे 50 वर्षे जुनी आहे. येथे स्वच्छतागृह, वीज व पाणीही नाही. त्यामुळे मुख्यालयात मुक्कामी राहण्याचे आदेश असूनही रात्री कोणताच कर्मचारी तेथे नसतो. उपकेंद्राला चहूबाजूंनी अतिक्रमणांचा विळखा असल्यामुळे चारचाकी वाहनही तेथे नेता येणे शक्य नाही. हलका पाऊस आला, तरी या इमारतीचे छत गळत असल्यामुळे रुग्णांची मोठी परवड होत आहे.

नियमांना फाटा : आरोग्य प्रशासनाच्या नियमानुसार पाच हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र, अशी तरतूद आहे. मग वाळूज भागातील लोकसंख्या 45 हजारांवर आहे. या नियमानुसार येथे 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करणे आवश्यक आहेत. याकडे आरोग्य प्रशासन कशामुळे दुर्लक्ष करीत आहे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.

लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम
वाळूज परिसरातील लोकसंख्या झापाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यसेवा पुरवणे अशक्य होते. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून वाळूज व अंबेलोहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच मंजुरी मिळवून घेतली आहे. या आरोग्य केंद्राच्या उभारणीस क ाही दिवसातच प्रारंभ होणार असून ती इमारत शिवाजीनगरलगतच्या शासकीय गायरान जमिनीवर उभी राहणार आहे. त्यात ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी विभाग, विविध लसीकरण सुविधा, मृतदेहाची उत्तरणीय तपासणी अशा सर्व सोयी असतील. शिवाय, लोकसंख्येच्या तुलनेत तेथे पुरेसे वैद्यकीय पथक उपलब्ध क रून दिले जाणार आहे. गंगापूर तालुक्यातील 7 गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रांनाही मान्यता मिळाली असून त्यांच्या कामांनाही लवकरच प्रारंभ होणार आहे. प्रशांत बंब, आमदार

उपचार करणे अवघड
या केंद्राअंतर्गत पाच गावे येतात. वाळूजची लोकसंख्या 28 हजारांवर आहे. पाच गावांसह एकूण लोकसंख्या 45 हजार होते. त्यासाठी दोन कर्मचार्‍यांसह एक मदतनीस आहे. वीज, पाणी, स्वच्छतागृह नसल्यामुळे गैरसोय होते. एस.आर.भालेराव, आरोग्य सेविका

आरोग्य केंद्र बंदच
गरीब व गरजू कामगारांच्या उपचारांसाठी अनेक वेळा आरोग्य केंद्रात जाण्याचा प्रसंग आला. मात्र, चार ते पाच वेळा जाऊनही मला आरोग्य उपकेंद्र उघडे दिसले नाही. उपकेंद्राच्या वेळा क ोणत्या, याबाबत ठळकपणे बोर्ड तरी लावावा. ज्ञानेश्वर बोरकर, पं.स. सदस्य

लस संपल्याने परतले
मुलाला पोलिओ व मला धनुर्वाताची लस घेण्यासाठी आले होते. मात्र, लस नसल्याचे सांगितल्याने माघारी जात आहे. बालकांचेही डोस संपल्याचे या वेळी तेथील नर्सने सांगितले. असा प्रकार नेहमीच घडत असल्याने वेळ वाया जातो. मंदाबाई रघुनाथ पवार, परदेसवाडी