आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन घाटीः परिचारिका, तंत्रज्ञांच्या रिक्त जागांमुळे रुग्णसेवेचा 'बॅकबोन फ्रॅक्चर'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थर्शेणी कर्मचारी अशी रुग्णांशी थेट संबंध येणारी घाटीची 'बॅकबोन' यंत्रणा पार कोलमडली आहे. सेवकांशिवाय घाटीचे पान हलू शकत नाही. असे असतानाही दरवर्षी 60-70 सेवक विविध कारणांनी कमी होत आहेत. तब्बल 418 रिक्त जागांचा मोठा खड्डा घाटीमध्ये पडला आहेत. तथापि, 'भरती बंद' म्हणून घाटीने हात झटकले आहेत. आऊटसोर्सिंगचा पर्याय खुला असताना तो मार्गसुद्धा बंद करण्यात आला आहे.

निवासी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सेवक हा रुग्णालयाचा 'बॅकबोन' समजला जातो. दुर्दैवाने हा'बॅकबोन'च मोडला आहे. तीन-चार वर्षांपासून सेवकांची भरती बंद झाली व आऊटसोर्सिंगही करण्यात आले नाही. दरवर्षी 60 ते 70 सेवक एकतर निवृत्त किंवा मृत्यूमुळे कमी होत आहेत. विरोधाभास म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागात चतुर्थ र्शेणी कर्मचार्‍यांची भरती सुरू असताना, वैद्यकीय शिक्षण खाते 'भरती बंद'चा नारा देत आहे.

रुग्णसेवेची अंधेरनगरी : एका वॉर्डात किमान 8 सेवकांची नितांत गरज असताना 3-4 पेक्षा जास्त सेवक कधीच नसतात. ओटीमध्ये व ओटीजवळ किमान सहा सेवकांची गरज आहे; पण कसेबसे एक-दोन सेवक असतात. त्यातच रुग्णालयासाठी घेतलेले 15 ते 20 सेवक विविध कार्यालयांसाठी हलविण्यात आले आहेत. अशा 'अंधेर नगरी..' कारभारामुळे रुग्णसेवेचा खेळखंडोबा होत आहे. परिणामी, रुग्णांना ने-आण करण्यासाठी बहुतेक वेळा सेवक नसतात. काही सेवक व्यसनी आणि कामचुकार आहेत, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोपही आहे.

20 परिचारिकांचे काम दोघींवर

तीन रुग्णांमागे एक परिचारिका हवीच. मात्र, इथे 60 रुग्णांमागे दोन परिचारिका असतात. प्रत्येक ओटीमध्ये परिचारिका कमी पडतात म्हणून वॉर्डातील परिचारिका ओटीला देण्यात येतात. त्याची किंमत वॉर्डातील रुग्णसेवेतून मोजली जाते.

घाटीतील जागा तत्काळ भरण्याचे आदेश

घाटी रुग्णालयातील चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा शासनाने महिनाभरात भराव्यात, अन्यथा आंदोलन करून रुग्णालय बंद पाडू, असा इशारा राज्य सरकारी चतुर्थर्शेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जागा रिक्त असल्यामुळे चार सेवकांचे काम एकाला करावे लागत आहे. परिणामी कामाच्या ताणाने अनेक कर्मचारी व्याधिग्रस्त झाले आहेत. काही कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, तर काहींना रुग्णालयातील संसर्गाने व्याधी जडल्या आहेत. शिवाय कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचे कारणही तेच असल्याचे संघटनेचे अध्यक्ष फुलचंद सलामपुरे यांनी सांगितले.