आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेझ’च्या जमिनी ताब्यात घ्या; सर्व प्रश्न सुटतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील उद्योजकांना प्लॉट मिळवणे स्वप्नांच्या पलीकडे झाले असताना विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एसईझेड) नावाखाली 800 एकरपेक्षा अधिक भूखंड वाटण्यात आले आहेत. पाच वर्षांपासून या जागेवर काही काम झाले नाही. उद्योजकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर एसईझेडखाली घेतलेल्या जागा एमआयडीसीने परत घ्याव्यात, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली.

सध्या वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसीमध्ये जागा नसल्यामुळे नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करता येत नाहीत. पाच वर्षांपासून शेंद्रय़ामध्ये जागा मिळण्यासाठी आतापर्यंत 1100 जणांनी अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना पाचशे स्क्वेअर फुटांचा प्लॉटदेखील मिळालेला नाही. सर्व अर्ज एमआयडीसीने फेटाळले.

तीन प्रकल्पांना 800 एकरपेक्षा जास्त जमीन : शेंद्रा एमआयडीसीमध्ये एकूण 2,150 एकर जमीन आहे. त्यात तीन प्रकल्पांना 800 एकरपेक्षा जास्त जमीन देण्यात आली आहे. मात्र, या जमिनीवर अद्याप कंपन्यांनी काम सुरू केलेले नाही. एकीकडे लघुउद्योजक भाड्याने जागा घेऊन त्यांचे उद्योग सुरू करत आहेत. छोट्याशा जागेत पोटमाळे करून उद्योग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक वर्षांपासून शेकडो एकर जमीन पडून आहे. त्यामुळे या जमिनी एमआयडीसीने परत घेतल्यास आणि त्याचे वाटप लघुउद्योग आणि मध्यम उद्योजकांना केल्यास जागेची समस्या सुटू शकते.

..तर उद्योगाची भरभराट होईल : सध्या अनेक मध्यम उद्योगांना जागेअभावी त्यांच्या उद्योगाचा विस्तार करता येत नाही. अनेकदा उत्पादन वाढीसाठी सुवर्णसंधी आल्यानंतरही त्याचे रूपांतर फायद्यात होऊ शकत नाही. लघुउद्योजकांना जागेच्या अडचणीमुळे कुठे भाड्याने तर कुठे पोटमाळे करून काम भागवावे लागत आहे.

सध्या एसईझेड ही संकल्पना राबवण्यात येत नसल्यामुळे या जमिनीचे वाटप केले तर उद्योग भरभराटीला येऊ शकतो, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले.