आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Problems Of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Student

अभियांत्रिकीला दिले, फार्मसीला नाकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य वेशीवर टांगले आहे. एरवी अभियांत्रिकी शाखेला ऊठसूट कॅरिऑन देणार्‍या विद्यापीठाने यंदा फार्मसीचा अभ्यासक्रम बदलला असतानाही येथील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा हा अधिकारच नाकारला आहे. कॅरिऑन देण्यास असर्मथ असल्याचे सांगण्यासाठी विद्यापीठाने तब्बल अडीच महिने घेतले. या काळात कुलगुरूंसह अनेक अधिकार्‍यांनी त्यांना ‘तारीख पे तारीख’ देत अंधारात ठेवले. यामुळे सुमारे 400 विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीईटी देऊन 4 वर्षांच्या बी-फार्मसीला प्रवेश मिळतो; पण 2013-14 हे शैक्षणिक वर्ष फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी दुर्दैवी ठरले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात फार्मसीचा अभ्यासक्रम तर बदललाच, शिवाय सेमिस्टर पद्धतही लागू झाली. आता हा अभ्यासक्रम 8 सेमिस्टरमध्ये विभागला गेला आहे. 2012-13 मध्ये 75 टक्के विद्यार्थी नापास झाले होते. नवीन अभ्यासक्रम असल्यामुळे त्यांना कॅरिऑनचा आधार वाटला. मात्र, विद्यापीठाने यास नकार दिल्यामुळे तब्बल 400 विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

फार्मसीला दुजाभाव
विद्यापीठाने आतापर्यंत कला, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, वाणिज्य, विधी, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, व्यवस्थापनशास्त्र अशा प्रत्येक बदललेल्या अभ्यासक्रमांना कॅरिऑन दिले आहे. दर वेळी फार्मसी यास अपवाद ठरलाय. अभियांत्रिकीला तर तीन वेळा कॅरिऑनच नव्हे, तर सुपर कॅरिऑन देण्यात आले आहे हे विशेष. दुसरीकडे इतर विद्यापीठांनी फक्त निवेदनावर फार्मसीला कॅरिऑन दिल्याचे स्पष्ट झाले.

बाहेर सहज मिळाले
नागपूर विद्यापीठाने फार्मसी विद्यार्थ्यांच्या एका निवेदनावर कॅरिऑनची मागणी मान्य केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वाराती व नागपूर विद्यापीठाने नुकतेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन दिले आहे.


3 महिन्यांपासून तारीख पे तारीख
यंदा 26 जुलै रोजी निकाल हातात पडल्यानंतर 2 पेक्षा अधिक विषय गेलेल्या विद्यार्थ्यांना धक्काच बसला. वर्ष वाया जाऊ नये म्हणून कॅरिऑनच्या मागणीसाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले. मात्र, त्याची दखल घेण्याऐवजी त्यांना तारीख पे तारीख देण्यात खुद्द कुलगुरूंनीही धन्यता मानली.

सुरुवातीला या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातील प्राचार्यांची भेट घेऊन कॅरिऑनची मागणी केली. त्यांनी हा विषय विद्यापीठ पातळीवरील असल्याचे सांगून तेथे मागणी करण्यास सांगितले.

19 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. विजय पंढरीपांडे यांची भेट घेऊन कॅरिऑनची मागणी मांडली. त्यांनी मदतीचे केवळ आश्वासनच दिले.

26 ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी नॅक कमिटी येत असल्यामुळे नंतर पाहू, असे सांगून वेळ मारून नेली.

2 सप्टेंबर रोजी बीसीयूडीचे संचालक डॉ. झांबरे यांना विद्यार्थी भेटले. त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय मांडण्याचे आश्वासन दिले.

10 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तंबू टाकून उपोषणाची तयारी केली होती, पण कुलगुरूंनी मध्यस्थी करत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांना लेखी मागितले. त्यावर त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्याचे लिहून दिले.

27 सप्टेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधीनींना बोलावले नाही. त्यामुळे त्यांनी घोषणाबाजी केली. मग एका विद्यार्थ्याला निवेदन घेऊन बैठकीत बोलावण्यात आले. दुसर्‍या दिवशी कॅरिऑनला मंजुरी देत नसल्याचे सांगण्यात आले.

थेट सवाल
डी. आर. माने,
कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

कॅरिऑनबाबत आपल्या विद्यापीठाचे नेमके धोरण काय आहे?
नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही विद्याशाखेला कॅरिऑन द्यायचे नाही, असा निर्णय झाला आहे. याबाबत तसा ठरावच संमत झाला आहे. यामुळे आता यापुढे कोणालाच कॅरिऑन मिळणार नाही. हा ठराव माझ्याकडे आला आहे. आता त्याची योग्य अंमलबजावणी करणे एवढीच माझी भूमिका आहे.
पण यापूर्वी मिळालेल्या कॅरिऑनचे काय? अभियांत्रिकीला अनेकदा मिळाले आहे.
होय, हे अगदी खरे आहे; पण याबाबत माझे वैयक्तिक मत विचाराल तर त्यांना कॅरिऑन द्यायला नको होते.
फार्मसीचे विद्यार्थी कॅरिऑनसाठी आंदोलन करतायत? त्यांना मिळणार का कॅरिऑन?
त्यांनी येथे शक्ती खर्च करण्यापेक्षा राहिलेल्या विषयांचा अभ्यास करावा. पुरवणी परीक्षेत त्याचा फायदा होईल.


थेट सवाल
प्रा. एस. पी. झांबरे
संचालक, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ

कॅरिऑनबाबत नेमके काय धोरण आहे?
नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणालाच कॅरिऑन न देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे यापुढे कोणालाही कॅरिऑन मिळणार नाही.
फार्मसीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
विद्यापीठात आपल्याला वाईट पायंडे पाडायचे नाहीत. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाहीत. अन् शेवटच्या क्षणी कॅरिऑनची मागणी करतात. हे चूक आहे. यामुळे विद्यापीठाचे नाव खराब होण्याची भीती आहे. अजून कॅरिऑन देत गेलो तर बाहेरील लोक आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकतील.
यापूर्वी मग इंजिनिअरिंगला तीन वेळेस कशामुळे कॅरिऑन मिळाले होते?
तो निर्णय त्या-त्या परिस्थितीला अनुसरून घेण्यात आला होता. कधी अभ्यासक्रम बदलला, कधी पॅटर्न बदलला, अनेक कारणे होती; पण आता कोणत्याही परिस्थितीत कॅरिऑन नाही म्हणजे नाहीच.
बदललेला अभ्यासक्रम आणि सेमिस्टर पद्धत लागू झाल्यामुळे समस्या

यंदा सेमिस्टर लागू होण्यासोबतच अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
1) जे विषय पूर्वी दुसर्‍या वर्षाच्या अभ्यासक्रमात होते ते आता पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये टाकण्यात आले आहेत, पण या विद्यार्थ्यांचे पहिले वर्ष झाल्यामुळे त्यांना या विषयांना मुकावे लागणार आहे, तर याच विषयावर आधारित आणखी काही विषय पुढील सेमिस्टरमध्ये असल्यामुळे त्यांची मोठी अडचण होणार आहे. जे विषय ते शिकलेच नाही, त्यांची परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे.

2- प्रथम वर्षाला नापास झालेल्यांना डिसेंबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यावी लागेल. यामुळे त्यांचे वर्ष वाया जाणार आहे.
3-प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर त्यांना सत्र पद्धत लागू होईल. यामुळे त्यांना चालू द्वितीय वर्षाचे 8 व प्रथम वर्षाचे 4 असे 12 विषय उत्तीर्ण व्हावे लागतील. तृतीय वर्षात जाण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्ष पूर्णपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, 12 विषयांचा अभ्यास करून त्यांना हे शक्य होईल की नाही याबाबत शंका आहे.

निकाल फक्त 25 टक्के :आपल्या विद्यापीठाअंतर्गत फार्मसीची 8 महाविद्यालये आहेत. यातून प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी यंदा 708 विद्यार्थ्यांचे अर्ज आले. 691 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. त्यापैकी फक्त 176 उत्तीर्ण झाले. म्हणजे निकाल 25.76 टक्के लागला. उत्तीर्णांची ही आकडेवारी लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण, श्री भगवान, यश इन्स्टिट्यूट, आर. डी. भक्त फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठाला पत्र लिहून या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याची विनंती केली आहे.

एटीकेटी, कॅरिऑन आणि सुपर कॅरिऑन

विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेत एकूण विषयांपैकी 25 टक्के विषयांत नापास झाला तरी त्याला पुढील वर्षात प्रवेश मिळतो. मात्र, पुढील वर्षाची वार्षिक परीक्षा होईपर्यंत त्यास मागील वर्गातील सगळे विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असते. यास एटीकेटी म्हणजेच अलाऊड टू कंटिन्यू टर्म असे म्हटले जाते. मात्र, विद्यापीठात एखाद्या शाखेचा अभ्यासक्रम बदलला तर त्याची तयारी करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते. बर्‍याचदा प्राध्यापक मंडळींनाही बदललेल्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी वेळ मिळालेला नसतो. यामुळे अशा विद्यार्थ्यांना कितीही विषयांत नापास झाले तरी पुढील वर्षात प्रवेश मिळतो. या प्रकारातही विद्यार्थ्याला पुढील वर्ष किंवा सेमिस्टरच्या वार्षिक परीक्षेपर्यंत मागील वर्षातील राहिलेले सगळे विषय उत्तीर्ण करावे लागतात. दुसरीकडे सुपर कॅरिऑन प्रकारात पहिल्या वर्षात कितीही विषय राहिले तरी त्यास पुढील वर्गात प्रवेश मिळत जातो. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षापर्यंत त्यास हे विषय काढण्याची मुभा मिळते. याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांचे अमूल्य असणारे वर्ष वाया जाऊ नये.


असा होतोय त्रास

- यंदा 26 जुलै रोजी निकाल लागण्यापूर्वी 20 जुलैपासून पुढील सेमिस्टरला सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांनी काही दिवस वर्ग केले, पण निकाल लागल्यानंतर त्यांना नापास झाल्यामुळे वर्ग करता येत नाही. आतापर्यंत जवळपास 40 टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे निकाल अधांतरी लटकल्यामुळे भविष्य धोक्यात आहे.

- यातील बरीच मुले बाहेरगावची आहेत. नापास झाले असले तरी त्यांची डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा आहे. त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे घराच्या किरायासोबत मेसचा खर्च, प्रवास खर्च आदींमुळे हे विद्यार्थी वैतागले आहेत.

पुनर्विचार करा
हा आमच्या करिअरचा प्रश्न आहे. एक वर्ष वाया जाणे म्हणजे पुढील संधीही गमावण्यासारखे आहे. विद्यापीठाने आमच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून कॅरिऑन लागू करावे.
राजकुमार मुंढे, नांदेड

आम्हीच टार्गेट का?
प्रत्येक शाखांना कॅरिऑन मिळत आला आहे, मग आम्हालाच टार्गेट करण्याचे काय कारण आहे हे समजत नाही. आमचे काय चुकले हे विद्यापीठाने सांगावे.
मिथुन सानप, औरंगाबाद