औरंगाबाद- दहावीत दोन वेळा नापास झालो. बारा वेळा सेट-नेट दिली. प्राध्यापक होण्याचा प्रयत्न केला. निराश झालो. चिडलो. पोलिसांत भरती झालो, तर तेही जमले नाही. बालपणापासून आयुष्य जिकडे वाहील तिकडे वाहू दिले. करमाळा ते मुंबईचा प्रवासही असाच धक्के खात झाला. जीवनात काहीही करा, पण त्या जगण्यात आत्मविश्वास असला की आनंद आपोआप मिळतो. मी फिल्म शिकलो नाही तर शिकत जगलो. ‘फँड्री’ ही माझी इंटर्नशिप होती. यापुढे सिनेमा करणार आहे की नाही हे माहिती नाही; मात्र मनातील उद्वेग बाहेर काढण्यासाठी काहीतरी करेन, असे उद्गार आहेत ‘फँड्री’ सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे.
एमजीएम परिसरात रविवारी मंजुळे आणि प्रसिद्ध कवी, अभिनेते किशोर कदम (सौमित्र) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या वेळी त्यांनी अनेल पैलूंवर प्रकाश टाकला. मंजुळे यांनी ‘पिस्तुल्या’ या शॉर्ट फिल्मपासून ‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटापर्यंतचा प्रवास मांडला. ते म्हणाले, हा चित्रपट म्हणजे माझी कथा आहे, हे अनेकांच्या जीवनातील अवास्तव वाटावे असे वास्तव आहे. आयुष्यात मित्रांनी मदत केली. माणसाला आजही जातीच्या परिमाणात मोजले जाते. लहानपणी जेव्हा शाळेत मास्तर जात विचारायचे, तेव्हा सांगताना जीभ जळाल्यासारखे वाटायचे. फुले-आंबेडकरांनी खूप काही शिकवले आहे. ते आपण कधी शिकणार, हा विचार सतत मनात घर करून राहतो. माझी कथा अजून संपलेली नाही. ती पुन्हा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समाजापर्यंत येईल.
शिकायच्या ऊर्मीने इथपर्यंत येऊन पोहोचलो
माझ्यातील कलाकाराला सत्यदेव दुबे यांनी ओळखले. पंधरा वर्षांच्या त्यांच्या सान्निध्यात आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. दुबेंना भेटल्यानंतर आयुष्य कसे जगायचे ते शिकलो. मुंबईच्या खार्या दांडा या कोळीवाड्यात माझे बालपण गेले. वडिलांनी लहानपणीच हॉटेलवर वेटर म्हणून कामाला लावले होते. शिकायच्या ऊर्मीने इथपर्यंत येऊन पोहोचलो, असे प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) यांनी सांगितले.
ते म्हणाले, शिक्षकांनी माझ्यातील पाठांतरचा गुण ओळखला आणि या क्षेत्रात आलो. मला काय व्हायचे होते आणि मी काय झालो हे आजही मला समजत नाही. चेतना कॉलेजला असताना आंतरमहाविद्यालयीव वक्तृत्व स्पध्रेत भाग घेतला. पाच पानांचे भाषण म्हणून दाखवले आणि अनपेक्षितपणे माझा नंबर आला. तेव्हा वर्तमानपत्रात आलेल्या माझ्या नावावर वारंवार हात फिरवत राहिलो. एकपात्री स्पध्रेत भाग घेण्याची सवय लागली. तेव्हापासून रंगमंचावर उभा राहिलो ते आजपर्यंत. दुबेंच्या अनेक नाटकांत काम करायला मिळाले. ‘नटसम्राट’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ अशा अनेक नाटकांनी मला घडवले. मात्र ‘फँड्री’चा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता. या लहान मुलांच्या अभिनयासमोर माझा अनुभव काहीच कामाचा नव्हता. मी सगळे शिकलेलो काही विसरलो होतो. अगदी सहज आणि वास्तवात जगत मी हा सिनेमा केला. जेव्हा मी अभिनय करायला लागलो, तेव्हा मला थांबव, असे मी नागराजला सांगितले होते. माझ्या हातून घडलेली ही कलाकृती मी पुन्हा तशीच घडवू शकेल का, यावर माझाच विश्वास नाही. नाट्यलेखक प्रा. अजित दळवी, निवेदक दत्ता बाळसराफ यांनी प्रकट मुलाखत घेतली.