आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपद्वारे महिला उद्योजक करणार उत्पादनाचे ब्रँडिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरात ज्या महिला स्वत:चा छोटा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. राज्यातील प्रसिद्ध आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या शाखेची सुरुवात शहरात २२ ऑक्टोबर रोजी फेस्टिव्हल शॉपीच्या प्रांगणात झाली. पंचवीस महिलांनी एकत्र येत व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला असून याद्वारे त्या एकमेकींना उद्योगाच्या अपडेटसह आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंगही करतील. प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा मीनल मोहाडीकर एमएसएसआयडीसीच्या प्रमुख अलका माजरेकर यांच्या उपस्थितीत या संघटनेच्या शाखेची स्थापना झाली. उद्योग उभारण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांना ही संघटना सर्वतोपरी मदत करते. दिवाळीपूर्वी शहरात सुरू झालेली ही दुसरी महिला उद्योजक संघटना आहे.
एमईडीसीच्या उपाध्यक्षा उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी मुंबईत आम्ही उद्योगिनीची सुरुवात केली. ही संघटना राज्यभरात पोहोचली. महिलांना उद्योजक बनण्यासाठी शासकीय योजनांची माहिती देणे, मालाची आयात-निर्यात, प्रदर्शनांची माहिती, उत्पादन निर्मितीसाठी साह्य करते. शहरातील पंचवीस महिला उद्योजकांनी एकत्र येत या संघटनेची शाखा सुरू केली.
या वेळी रजनी भोगले, ज्योती दाशरथी, जयश्री पत्की, पूनम छाबडा, डॉ. चारुलता रोजेकर, दीपाली जाधव, वनिता दंडे, अदिती गोरे, सुलभा भाले, अलका देवळाणकर, अंजली कुलकर्णी, प्रज्ञा मुंडे, कांचन बापट, सनिता चालसे, स्वाती श्रॉफ, सुलेखा कुलकर्णी, स्मिता आवचार, रिया जैस्वाल, आरती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्यात सुरुवात
^आम्ही उद्योगिनीची औरंगाबाद शाखा प्रथमच सुरू होत आहे. महिलांना स्टार्टअपच्या योजनांची माहिती देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, उत्पादन, विक्रीसाठी बाजारेपेठेची माहिती देणे हे कार्यक्रम वर्षभर मोफत देतो. आमच्या संघटनेत नाव नोंदणी, मीटिंगसाठी पैसे आकारत नाही. कार्यक्रमातही मोफत मार्गदर्शन केले जाते. उद्देश एकच आहे, महिला उद्योजक उभ्या राहाव्यात. मराठवाड्यात २५ महिलांनी औरंगाबाद शहरातून जोरदार सुरुवात केली आहे. -मीनल मोहाडीकर, अध्यक्षा, आम्ही उद्योगिनी
बातम्या आणखी आहेत...