वाळूज- वाळूज भागातील वाळू व्यावसायिकांना नगर जिल्ह्यात वाळू विक्री करण्यासाठी तेथील व्यापारी मनाई करतात. वाळूज भागात मात्र, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू आयात केली जाते. नगर येथील व्यापा-यांच्या या दुटप्पी धोरणामुळे संतापलेल्या वाळूज येथील वाळू व्यावसायिक चालक-मालक संघटनेच्या पदाधिका-यांनी नगर जिल्ह्यातून वाळू भरून आलेला ट्रक शिवराई टोलनाक्यावर अडविला होता.
हा ट्रक सोडवण्यासाठी दोन गाड्यांमधून आलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळीने गावठी कट्टे दाखवून दहशत पसरवल्याची घटना रविवारी नगर-औरंगाबाद मार्गावर घडली.औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप वाळू उपसासंदर्भातील लिलाव प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची गरज भासते. ही संधी साधत वाळू व्यावसायिकांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यातून नगर आणि वाळूजच्या वाळू व्यावसायिकांमध्ये हद्दीवरून मागील सहा महिन्यांपासून वाद सुरू आहे.
वाळूजमधील वाळू व्यावसायिकांनी एकत्र येत वाळू व्यावसायिक चालक-मालक संघटनेची स्थापना केली. त्याद्वारे नगर जिल्ह्यातील व्यावसायिकांना आपल्या हद्दीमध्ये वाळू विक्री करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संघटनेचे रमेश आरगडे, कैलास गवंदे, गोरख घुले, विश्वनाथ थोरात, नितीन चव्हाण, कडू बकवाल, बाबासाहेब आरगडे, शिवनाथ दुबिले, संतोष आरगडे आदींनी जुन्या शिवराई टोलनाक्यावर नगर जिल्ह्यातून आलेले वाळूचे दोन ट्रक अडविल्याने ते माघारी फिरले. मात्र, रविवारी रात्री तीनच्या सुमारास पुन्हा तिसरा ट्रक (एम.एच. 43-9230) आला. या ट्रकच्या पुढे आणि मागे संरक्षणासाठी दोन कार होत्या. त्यात 20 ते 25 जणांची टोळी होती. वाळूजच्या संघटनेच्या लोकांनी हा ट्रकही अडविला. तेव्हा दोन्ही वाहनातून खाली उतरलेल्या माणसांमध्ये आणि वाळूज येथील व्यापा-यांमध्ये वादावादी झाली. तेव्हा कारमध्ये आलेल्या माणसांनी गावठी कट्टे रोखत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रक ताब्यात घेतला. चालक मात्र पसार झाला. या संदर्भात महसूल विभागाला माहिती दिली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविला जाईल. अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.