आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दत्ता भगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३७ व्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार, समीक्षक प्रा. दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

हे संमेलन १२ १३ मार्चला जालना येथे होणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी आहेत. कोठारी एज्युकेशन हब या शिक्षण संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयाेजन करण्यात येणार आहे. प्रा. भगत यांच्या रूपाने प्रथमच एक नाटककार मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून पद भूषवणार आहेत. अश्मक, खेळिया आणि वाटा-पळवाटा ही त्यांची गाजलेली नाटके असून ‘आवर्त आणि इतर एकांकिका’, जहाज फुटलं आहे.शोध पाय वाटांचा, पिंपळ पानांची सळसळ हे ललित लेख संग्रह आणि दलित साहित्य: दिशा आणि दिशांतर, दलित साहित्य: वाङ्मयीन प्रवाह, निळी वाटचाल आधुनिक मराठी वाङ्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि समकालीन साहित्य आणि समीक्षा या समीक्षाग्रंथासह त्यांनी विपुल लेखन त्यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि विशेष म्हणजे २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याचे पुढील ५० वर्षांसाठीचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे ते उपाध्यक्ष होते. त्याना राज्य शासनाच्या पुरस्कारांसह अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा दलित साहित्य लेखन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. या वेळी प्रा. किरण सगर, प्रा. भास्कर बडे, डॉ. दादा गोरे, प्रा. जयराम खेडेकर यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...