आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professor Girl Student Harassment Case Aurangabad

विद्यार्थिनीचा दोन वर्ष छळ; प्राध्यापकाच्या तोंडाला काळे फासले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नक्षत्रवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणार्‍या प्राध्यापकाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास काळे फासून मारहाण केली. महेश मार्कंडेय असे त्याचे नाव असून तो संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख आहे. विद्यार्थिनीने मात्र पोलिसांकडे तक्रार केली नसून महाविद्यालय व्यवस्थापनाने मार्कंडेयला तकडाफडकी निलंबित केले.

महेश हा दोन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत असल्याची तक्रार खुद्द युवतीने भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मनोज भारस्कर यांच्याकडे केली होती. तसेच या प्राध्यापकाची ‘टेप’ भारस्कर यांना ऐकवली. त्यानंतर सोमवारी भारस्कर आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी मार्कंडेयला क्लासरूममधून ओढत बाहेर आणून मारहाण केली. यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले. महाविद्यालयाच्या आवारात धिंड काढत प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्यासमोर हजर करण्यात आले. डॉ. देशमुख यांच्या कार्यालयातही कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाला काळे फासले.

प्रशासकीय अधिकारी डॉ. देशमुख यांना घेराव
मार्कंडेयला तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे केली. चर्चेनंतर मार्कंडेयला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तत्पुर्वी त्याच्याकडून आपली चूक झाली असल्याचे मान्य करून लेखीनामा लिहून दिला आहे.

पोलिसांची धावाधाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले. दुपारी अडीच वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यावर महाविद्यालयात ‘खल’ सुरू होता. संस्थाचालक तथा प्रसिद्ध उद्योजक पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, मनोज भारस्कर, राजू बागडे, मनदीप राजपूत, राहुल गोरे, रामेश्वर भादवे, अमित लोखंडे, प्रकाश धुर्वे, कृष्णा आगलावे, अमेय देशमुख, याज्ञिक पटेल, गोविंद साखरे, महेश देशमुख, प्रमोद जाधव आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. चर्चेअंती मार्कंडेयच्या निलंबनावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्याच्याकडून लेखी माफीनामाही घेण्यात आला आहे. यासंदर्भात कुणीही तक्रार केली नसल्याचे सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबुराव कंजे यांनी सांगितले आहे

विशाखा समितीकडे मुली येतच नाहीत
*महाविद्यालयामध्ये विशाखा समिती कार्यरत असून त्याच्या नियमित बैठकाही घेतल्या जातात. मुली मात्र पदवीधर होत असताना त्यांना विशाखा समिती माहिती नसणे म्हणजे आश्चर्यच आहे. मुलींनी बिनधास्तपणे विशाखा समितीकडे तक्रार करावी. - प्रा. भारती खांडेकर, अध्यक्षा, महिला सुरक्षा समिती.

मला येथेच मारून टाका
*मी कोणत्याही युवतीची छेड काढलेली नाही. कोणाला काहीही बोललो नाही. हवे तर मला येथेच मारून टाका. - महेश मार्कंडेय, निलंबित प्राध्यापक