आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professor Rajan Gavas Comment On Current Education System

आगामी काळात होतील शिक्षणामुळे आत्महत्या - प्रा. राजन गवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राथमिक शिक्षणाची होत असलेली अवस्था आणि बाजारीकरण पाहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या शाळाच बंद होऊ लागल्या आहेत. ज्ञान देण्याऐवजी जर असाच बाजार सुरू राहिला तर वैफल्य येऊन येणाऱ्या काळात शेतकऱ्यांऐवजी शिक्षणामुळे आत्महत्या होण्याचे चित्र दिसून येईल. जे आपल्या समाजासाठी घातक असेल, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत गुरुवारी प्रा. गवस यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी विविध विषयांवर परखड मत मांडले. प्रा. गवस म्हणाले की, जागतिकीकरणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे जगभरातील सर्व माहिती एका क्षणात मिळाली खरी, मात्र आपल्या बाजूच्या गावात काय चालले आहे. यासाठी आपल्याला निरोपाची वाट पाहावी लागते. त्यामुळे आपण कोणत्या गर्तेत ओढले जात आहोत, याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. असेही ते या वेळी म्हणाले.

साहित्य लेखनाविषयी गवस म्हणाले की, लेखक हा तटस्थ असतो. याचे कारण म्हणजे त्याला आपल्या भाेवतालचे जग संुदर असावे असे वाटत असते. त्यामुळे आपल्या लेखणीतील शब्दातही तो त्याच संुदरतेला मांडण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे होते. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा.दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाषा ही भाषाच असते
भाषा शुद्ध अशुद्ध यावर नेहमीच चर्चा होते. या विषयी विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना प्रा. गवस म्हणाले की, भाषा ही फक्त भाषा असते. ती शुद्ध किंवा अशुद्ध नसते. ती व्यवहारसुलभ असावी. म्हणून प्रमाणभाषा बोली भाषा टिकवते.