आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठातील प्राध्‍यापकांची धूर गाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यापीठातील मराठी विभागात कधी विभागप्रमुखांनी प्राध्यापकांच्या खोल्या मेकअप रूम म्हणून मुलींना दिल्याची तक्रार, तर कधी एकमेकांच्या प्रोजेक्टचा निधी पळवला म्हणून, तर कधी पोथीशाळेच्या वादामुळे या विभागाबद्दल कायम चर्चा ऐकायला येते. गेल्या वर्षभरापासून असे विविध प्रकार होत आहेत. त्यातच आता हा सिगारेटचा विषय चांगलाच गाजत आहे.


महिला प्राध्यापक, विद्यार्थिनी वैतागल्या
आधीच विविध गोष्टींनी गाजत असलेल्या या विभागातील वरिष्ठ प्राध्यापक त्यांच्या केबिनमध्ये सिगारेट ओढतात. त्याचा आम्हाला त्रास होतो, अशी तक्रार काही विद्यार्थिनींनी महिला प्राध्यापिकेकडे केली. त्यांनाही हा प्रकार नवीन नव्हता. आपल्याला जो त्रास होतोय तो आता विद्यार्थिनींनाही होतोय हे ऐकून त्या प्राध्यापिका संतापल्या. त्यांनी आपल्या ज्येष्ठ सहकार्‍याची मोठय़ा हिमतीने थेट कुलगुरू व कुलसचिवांकडे तक्रार केली. कुलगुरू व कुलसचिवांनी त्या महिला प्राध्यापिकेच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. त्यांनी लगेच सर्वांनाच विभागात बोलावले व त्या प्राध्यापकांसह विभागप्रमुखांना याबाबत समज दिली.


निमित्त ठरले प्रा. लुलेकर
प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर हे चेन स्मोकर आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:च्या केबिनमध्ये सिगारेट ओढतात. विद्यार्थी- विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक केबिनमध्ये असतानाही ते कुणाचा मुलाहिजा बाळगत नसल्याचेही या वेळी कुलसचिवांना सांगण्यात आले. आधीही एकदा त्याच प्राध्यापिकेने डॉ. लुलेकरांविषयी तक्रार केली होती; पण त्याची दखल त्या वेळी घेतली गेली नाही. आता त्यांनी 15 मार्च रोजी स्वत: जाऊन तोंडी तक्रार केली. यावर 16 मार्च रोजी कुलगुरूंनी मराठी विभागप्रमुखांना बोलावून बैठक घेतली व याबाबत सूचना दिल्या.


दुष्काळाचे कारण
मराठी विभागात कमालीचे राजकारण शिरले आहे. यंदा शैक्षणिक उपक्रमात पद्मर्शी यु. म. पठाण व माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांची व्याख्याने ठेवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी लेखकांना भेटण्यासाठी सहल, वा. ल. कुलकर्णी व्याख्यानमाला, पोस्टर पोएट्री असे उपक्रम असणारा साहित्य उत्सव आखण्यात आला होता, पण हा उत्सव डॉ. लुलेकरांच्या सूचनेवरून विभागप्रमुख डॉ. परशुराम गिमेकर यांनी रद्द केल्याचे विभागात दबक्या आवाजात बोलले जाते. केवळ यु. म. पठाण यांना विरोध म्हणून महोत्सव रद्द करण्यात आल्याची चर्चा प्राध्यापक व विद्यार्थी करतात.


प्रा. यु. म. पठाण यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावरूनही खूप गोंधळ झाला. आम्हाला विभागातील प्राध्यापक रागावले. असे व्हायला नको होते.विद्यार्थी


आम्ही तक्रारीसाठी गेलो होतो
मराठी विभागातील आम्ही सर्व विद्यार्थी कुलसचिवांकडे तक्रार घेऊन गेलो होतो. कारण साहित्य महोत्सव व आमची सहल दुष्काळाचे कारण दाखवून रद्द करण्यात आली; परंतु तेथे प्रा. लुलेकर येताना दिसले. त्यामुळे सर्व विद्यार्थी आल्यापावली मागे फिरले.विद्यार्थी


प्राध्यापक लुलेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून विभागात स्वत:च्या केबिनमध्ये खुलेआम सिगारेट ओढतात. याचा त्रास माझ्यासह अनेक विद्यार्थिनींना होतो. विद्यार्थिनी बोलू शकत नाहीत, म्हणून मीच धाडस करून कुलगुरू व कुलसचिवांकडे तक्रार केली. हा प्रकार बंद व्हायला हवा, यासाठी ही माझी दुसरी तक्रार होती. पीडित प्राध्यापिका


थेट सवाल
डॉ. प्रल्हाद लुलेकर
प्राध्यापक व माजी विभागप्रमुख
तुम्ही केबिनमध्ये सिगारेट ओढता अशी तक्रार आहे.
हे खोटे अहे. तक्रार कोणी केली हे मला माहिती आहे. माझी बदनामी करण्यासाठी डाव रचला जात आहे.
तुम्ही सिगारेट ओढत नाही का?
खरे आहे, पण विभागात वा केबिनमध्ये ओढत नाही.
एक महिला प्राध्यापक याबाबत तक्रार करते, ही बाब गंभीर आहे.
मुळात मी इथे विभागात सिगारेट ओढतच नाही. त्यामुळे त्यांना त्रास होण्याचा प्रश्नच नाही.
मग तुमचीच तक्रार का करतात?
माहीत नाही. काहींचा मला बदनाम करण्याचा डाव आहे.
सिगारेट पिऊ नका, अशी नोटीस मराठी विभागासाठी काढावी लागली, ही लाजिरवाणी बाब आहे.
तेच मी सांगतोय. काही प्राध्यापक आहेत, ते मला बदनाम करत आहेत.
त्यांची नावे सांगा.
नाही, मी कोणाचे नाव घेणार नाही. साहित्य महोत्सव तुम्ही का रद्द करायला लावला..
यंदा भयंकर दुष्काळ आहे म्हणून मी ती सूचना मांडली.
दुष्काळाचा काय संबंध?
मला तसे वाटले म्हणून मी तशी सूचना विभागाच्या बैठकीत मांडली.
पठाण सर येऊ नयेत म्हणून तुम्ही
महोत्सवच रद्द करायला लावला, असा आरोप होतोय.
नाही. ते मला गुरुस्थानी आहेत, पण हल्ली त्यांच्या बोलण्यात तारतम्य नाही. दुसरे म्हणजे आम्ही त्यांना का बोलावावे? त्यांनी माझ्या विभागावर लिहिले म्हणून मी प्रत्युत्तरादाखल एक लेख लिहिला, तेव्हापासून ते नाराज आहेत.
तुमची तक्रार केली म्हणून विद्यार्थांना नापास करण्याची धमकी तुम्ही देता, हे खरे आहे काय?
नाही. उलट ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत करतो. पैसे नसल्याने एक विद्यार्थी शिक्षण सोडून जात होता. त्याचा सर्व खर्च केला. मी असा खोटा आरोप सहन करणार नाही.


थेट सवाल
डॉ. डी. आर. माने
कुलसचिव
तुमच्याकडे प्रा. लुलेकरांविषयी तक्रार आली होती काय?
ती तोंडी स्वरूपाची होती. महिला प्राध्यापकांना त्यांच्या सिगारेट ओढण्याचा त्रास होतोय, असे त्यांचे म्हणणे होते.
तुम्ही काय कारवाई केली?
नियमानुसार आवारात सिगारेट ओढता येत नाही. मी त्या प्राध्यापिका व डॉ. लुलेकर तसेच विभागप्रमुख डॉ. परशुराम गिमेकर यांना समजावून सांगितले. तशी नोटीसही विभागप्रमुखांना काढायला सांगितली आहे.
साहित्य महोत्सव रद्द करण्यात आल्याचे खरे आहे का?
नाही. दुष्काळाचा शैक्षणिक उपक्रमाशी कसा संबंध जोडता येईल? मराठी विभागाला हा महोत्सव घ्यायला सांगितला आहे.
यु. म. पठाणांना विरोध म्हणून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
नाही, ते चूक आहे. डॉ. यु. म. पठाण मोठे साहित्यिक आहेत.