आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी ६८ रुपयांची हद्द अाेलांडली; मोबदला वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अपुरे मनुष्यबळ, सततचा बंदोबस्त यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करावे लागते. आतापर्यंत अशा एका दिवसासाठी अवघे ६८ रुपये अन् तेही काही महिन्यांनंतर मिळत. परंतु आता युती सरकारने त्यात बदल केले असून मूळ वेतन भत्त्यांसह एक दिवसाचा पगार साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्याने मिळणार आहे. मात्र, वर्षातून जास्तीत जास्त दिवसच हा भत्ता मिळू शकेल. एप्रिल २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पोलिस शिपाई ते निरीक्षकांपर्यंत हा भत्ता मिळणार आहे. साप्ताहिक सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्यांना हा भत्ता दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे तसेच घटक कार्यालयात स्वतंत्र नोंद ठेवण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. म्हणजेच सरसकट कोणालाही हा भत्ता मिळणार नाही, त्याची नोंद ठेवण्याबरोबरच तपासणीसाठी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतील.

कशामुळे निघाला जीआर?
गुरुवारी जारी झालेल्या शासन निर्णयाची सुरुवातच वाढती लोकसंख्या, भरमसाट धार्मिक कार्यक्रम, सण, नवरात्रोस्तव, ईद, गणेशोत्सव, दिवाळी तसेच राजकीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींची विविध शहरात भेट, त्यांचा बंदोबस्त करावा लागत असल्यामुळे पोलिसांना बऱ्याच वेळा १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ऐनवेळी पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द कराव्या लागतात. त्या बदल्यात देण्यात येणारा मोबदला हा अत्यल्प आहे. २००४ पासून त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एक हजारापर्यंत होईल फायदा
सध्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलिस कर्मचाऱ्यांना अवघे ६८ रुपये मिळत असत; परतु आता हीच रक्कम पगाराच्या तुलनेत मिळणार असल्याने जवळपास हजार रुपये मिळू शकतील, असे पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षकाला एका दिवसासाठी मिळणारी रक्कम यापेक्षा दुप्पट असेल.

६८ रुपये मोबदला पेट्रोल खर्चातच
सुटीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला मिळावा यासाठी पोलिस कर्मचारी आयुक्तालयात चकरा टाकत. मात्र, दोन चकरांत ६८ रुपयांपेक्षा जास्तीचे पेट्रोल खर्च होत होते. त्यामुळे कर्मचारी या मोबदल्याकडे दुर्लक्ष करत. आता यापुढे तसे होणार नाही. शासनाने निर्णय घेतला असेल तर आपोआप पगारात ही रक्कम जमा करण्याची व्यवस्था करावी, असेही पोलिस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.