आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची अवकृपा; प्रकल्प कोरडेच, बोरदवगळता इतर प्रकल्प कोरडेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजनेतून ग्रामीण भागात २० गावांची तहान २५ टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. ऐन पावसाळ्यात ढगाळ वातावरण असूनही पावसाचा पत्ता नाही. परिणामी, वाड्या-वस्त्यांवर तहान भागवण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जून महिन्यात १२ तारखेचा दमदार पाऊस वगळता आतापर्यंत पावसाने सर्वदूर भागात उघडीप दिल्याने येथील बोरदहेगाव मध्यम प्रकल्प सोडता इतर मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पाण्याअभावी कोरडेठाक पडले असल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसण्याची वेळ आली आहे, तर दुसऱ्या बाजूने शेतात लागवड केलेली ८७ हजार हेक्टरमधील खरिपाची पिके जमिनीतील ओलसरपणा नसल्याने माना टाकत असून भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. दमदार पाऊस कधी बरसेल, या प्रतीक्षेत नागरिक आभाळाकडे डोळे लावून पाहत आहेत.

सलग तीन वर्षे पावसाने दडी मारल्याने तालुका दुष्काळाच्या दुष्टचक्रात चांगलाच होरपळून निघाला. या वर्षी चांगला पाऊस होईल अशी भाबडी आस मनाशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांचा अपेक्षाभंग पावसाने केला. गेल्या वर्षात खरीप व रब्बी हंगामाची पिके हाताशी आली नाहीत. त्यात काही ठिकाणी गारपिटीच्या पावसाने त्यावर नुकसानीचा नांगर घातला. जवळपास ७० गावांची १०२ टँकरने तहान भागवण्यात प्रशासनाकडून जूनपर्यंत उपाययोजना करण्यात आली होती. तीच परिस्थिती जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने ओढावण्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यात २० गावांना २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्यात एकदाच दमदार पावसाच्या सलामीने बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा झाला होता.