आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prominant Leaders Defeated In District Bank Elections, Shocked To Chavan

जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांचे पानिपत! नांदेडमध्ये चव्हाणांना, बीडमध्ये मुंडेंना धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांनी मराठवाड्यातील दिग्गजांचे पानिपत केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची धूळधाण झाल्यानंतर पक्षात नवा जोश भरण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी नेमलेले अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुजन तोंडवळा देण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी बढती मिळालेले धनंजय मुंडे यांना या निवडणुकीत पराभवाचे धक्के बसले. तब्बल ३० वर्षे लातूर जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या देशमुखांनी वर्चस्व अबाधित राखण्यात यश मिळवले असले तरीही दोन जागा जिंकून भाजपने देशमुखांच्या गढीत चंचुप्रवेश केला तर औरंगाबादेत सुरेश पाटलांनी ‘दादा’गिरी कायम राखली.

नांदेडेच्या निवडणुकीत चव्हाणांच्या नेतृत्वातील किसान समृद्धी पॅनलला शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलने चितपट केले. शेतकरी पॅनलला २१ पैकी १५ जागा, तर चव्हाणांच्या पॅनलला केवळ ५ जागा मिळाल्या. वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यासाठी त्यांनी जोरहीलावला होता परंतु शेतकरी विकास पॅनलसमोर त्यांचा निभाव लागला नाही. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ लोकविकास पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक बचाव पॅनलचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. वैद्यनाथ लोकविकास पॅनलला १९ पैकी १६ जागा मिळाल्या तर बँक बचाव पॅनलच्या पदरात केवळ तीनच जागा पडल्या. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पंकजा मुंडे यांचा हा दुसरा मोठा विजय ठरला असून पंकजा मुंडे यांच्याशी आमदार जयदत्त क्षीरसागर व माजी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या हातमिळवणीचा राष्ट्रवादीला फटका बसला. औरंगाबाद जिल्हा बँकेत १५ पैकी १३ जागा जिंकून सुरेश पाटील यांनी वर्चस्व कायम राखले. विरोधकांना २ जागा मिळाल्या.

विजयी उमेदवार
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या गटाचे ५ सदस्य बिनविरोध झाले होते. ते पाटील यांच्याच गटाचे होते. १५ जागांसाठी मतदान झाले. त्यातील १३ जण पाटील गटाचे आहेत. बिनविरोध: जावेद पटेल, बाबूराव पवार, अंकुश रंघे, नंदकुमार गांधिले व संदिपान भुमरे. बिगरशेती मतदारसंघ: अब्दुल सत्तार (२८३), अभिजित देशमुख (२८७), दामोदर नवपुते (२८३), सुरेश पाटील (३०८) व हरिभाऊ बागडे (२९५). पणन संस्था मतदारसंघ : नितीन पाटील (३७).महिला राखीव : वर्षा जगन्नाथ काळे (७९२) व मंदाबाई अण्णासाहेब माने (७५७) .एससी, एसटी मतदारसंघ : दशरथ गायकवाड (७५८) वैजापूर मतदारसंघ : रामकृष्ण बाबा पाटील (८१). खुलताबाद मतदारसंघ : किरण अशोक पाटील (११), कन्नड मतदारसंघ : अशोक सर्जेराव मगर (४९), पाटील गटाचे नारायण जाधव हे अवघ्या एका मताने पराभूत झाले. जाधव यांना ४८ मते मिळाली. फुलंब्री मतदारसंघ : पुंडलिक साहेबराव जंगले (२९), पाटील गटाचे जितेंद्र जैस्वाल यांना २८ मते मिळाली. ते एका मताने पराभूत झाले. सिल्लोड: प्रभाकर पालोदकर. सोयगाव : रंगनाथ काळे (१९).

नांदेड : शेतकरी विकास पॅनलचे आमदार नागेश पाटील आष्टीकर (हदगाव), गंगाधर राठोड (मुखेड), भास्करराव पाटील खतगावकर (बिलोली), राजेश देशमुख कुंटूरकर (नायगाव), डाॅ. सुनील कदम (नांदेड), आमदार प्रताप पाटील चिखलीकर (लोहा), प्रवीण पाटील चिखलीकर (कंधार), दिनकर दहिफळे (किनवट), बापूसाहेब गोरठेकर (उमरी) हे विजयी झाले. बिगर शेती मतदारसंघातून दिलीप कंदकुर्ते, अनुसूचित जाती मतदारसंघ लक्ष्मण ठक्करवाड, बिगरशेती वैयक्तिक मतदारसंघातून मोहन पाटील टाकळीकर विजयी झाले. चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलच्या विजयी उमेदवारांत अन्नपूर्णा देशमुख (देगलूर), बालासाहेब कदम (भोकर), शंकर शिंदे (हिमायतनगर), गोविंद शिंदे (मुदखेड), केशव पाटील (अर्धापूर).

बीड : वैद्यनाथ लाेकविकास पॅनलचे दत्तात्रय ज्ञानाेबा पवार, नितीन जिवराज ढाकणे, फुलचंद राजाभाऊ मुंडे, अादित्य सुभाष सारडा, महादेव तुकाराम ताेंडे, संगीता सुरेश धस, मीनाबाई मार्तंडराव राडकर, दिनेश जगन्नाथ परदेशी, सर्जेराव भगवान तांदळे, परमेश्वर नागाेराव उजगरे हे विजयी झाले तर राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या बंॅक बचाव पॅनलचे चंद्रकांत प्रकाश शेजूळ, कैलास बाबासाहेब नलावडे, भाऊसाहेब कचरू नाटकर. बिनविराेध निवडून आलेल्यांत सत्यभामा रामकृष्ण बांगर, संध्या दशरथ वनवे, ऋषीकेश प्रकाशराव अाडसकर, शीतल दिनकर कदम, साहेबराव पंढरीनाथ थाेरवे यांचा समावेश आहे. बँकेचे पूर्वीचे वादग्रस्त अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांचे सुपुत्र फुलचंद मुंडे विजयी झाले. तर वैद्यनाथ लोकविकास पॅनलमध्ये महिला प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस यांना ८७९ मते मिळून त्या विजयी झाल्या. लातूर: जिल्हा बँकेच्या १९ जागांपैकी १३ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील, जळकोटमधून धर्मपाल देवशेट्टे, देवणीत भगवान वामनराव पाटील, चाकूरमध्ये नागनाथ पाटील, शिरूरअनंतपाळमध्ये व्यंकट िबरादार आणि पतसंस्था मतदारसंघातून रमेश कराड विजयी झाले. कराड यांचा साखर कारखान्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा बँकेत पराभूत होतील, असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला. या मतदारसंघात २०४ पैकी २०३ जणांचे मतदान झाले होते. त्यातील ११४ मते कराडांना मिळाली. उर्वरित ८९ मते गोविंदपूरकरांना मिळाली. पंचवीस मतांनी कराडांचा विजयी झाले.

परभणी : एकूण २१ जागांपैकी १७ जागा जिंकून सुरेश वरपुडकरांच्या नेतृत्वातील जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलने बँकेवर वर्चस्व कायम राखले. बँक बचाव पॅनलला केवळ चार जागा मिळाल्या.

वांद्रेनंतर चव्हाणांना दुसरा धक्का
चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर झालेली ही पहिली निवडणूक होती. ती बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. त्या वेळी काँग्रेसला ९-१० जागा सोडण्याची तयारी विरोधकांनी दाखवली; परंतु मुखेडच्या जागेवरून ही बोलणी फिस्कटली. या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाण प्रथमच जिल्हा बँकेच्या राजकारणात उतरले. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर निवेदन जारी करून बँकबुडव्यांना विजयी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले; परंतु मतदारांनी अखेर विजयाची माळ बहुतांश जुन्या संचालकांच्याच गळ्यात घातली.

दोन गट आमने- सामने
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा राष्ट्रवादीचे दोन गट समोरासमोर आले. धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके एक गट, तर दुसरा गट जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांचा होता. धस व क्षीरसागरांनी पंकजा मुंडेंशी हातमिळवणी केली. दोन गट समोरासमोर लढल्यानेे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला.

मराठवाड्यातील चार जिल्हा बँकांची सद्यस्थिती
औरंगाबाद : १९१७ मध्ये स्थापना. कोअर बँकिंग, एसएमएस, एटीएम सेवा. ९०८ कोटींच्या ठेवी, ५० कोटींवर नफा. शहरी १७, ग्रामीण ४५ शाखा.
नांदेड : २००० पासून बँक डबघाईला. सध्या ५६६ कोटींचे कर्जवाटप. ५६२ कोटींच्या ठेवी. २०३ कोटी अनुत्पादित कर्ज.
बीड : कर्जदार घोटाळ्यांने त्रस्त. ६९१ काेटींच्या ठेवी, १ हजार ७८ काेटी रुपयांचे कर्ज वाटप. बँकेवर २९५ काेटी रुपयांचे कर्ज.
लातूर : १२०० कोटींच्या ठेवी. १२९३८७ कोटींचे कर्ज. ७४० कोटींचा वार्षिक नफा. लातूर जिल्ह्यात एकूण ११२ शाखा.

एकहाती कारभारास सुरुंग
३० वर्षे लातूर जिल्हा बँकेवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या दिलीपराव देशमुखांनी बहुमत राखले. मात्र, भाजपने २ जागा जिंकून प्रवेश केला. त्यामुळे मजबूत तटबंदीने सांभाळलेल्या बँकेच्या सातमजली इमारतीस सुरुंग लागला.

एका मताने नशीब पालटले
सेवा मतदारसंघातून धारूरमधून वैद्यनाथ पॅनलचेे गाेरख अात्माराम धुमाळ व बँक बचाव पॅनलच्या संगीता साेळंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका मताच्या फरकाने धुमाळ यांचा विजय झाला. या लढतीकडे धारूर तालुक्याचे लक्ष लागले होते.