आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property Tax Not Paid Issue At Aurangabad, High Court Take Action

बड्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक करा, कर थकवणाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बडगा उगारला आहे. अशा बड्या थकबाकीदारांची नावे वेबसाइटवर तसेच वर्तमानपत्रांत जाहीर करा, असे आदेश न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, पी. आर. बोरा यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. कर वसुलीसाठी मनपातर्फे अकरा कलमी कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर तिजोरीत किमान ५५ कोटींची भर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पडू शकते. या रकमेचा शहराच्या विकासासाठी उपयोग होऊ शकतो.
खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पार्टी इन पर्सन अॅड. रूपेश जैस्वाल यांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी (१३ मार्च) सुनावणीस निघाली. शहराचा चेहरामोहरा बदलण्याची दिशा देणारे निर्देश आैरंगाबाद हायकोर्टाने सुनावणीत दिले आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाला हायकोर्टाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत.

महापालिकेच्या वतीने शपथपत्र दाखल करून शहरातील रस्त्यांसाठी निधीची अडचण येत असून, काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पैशांची चणचण भासत असल्याचे मनपाने सांगितले. नुकतेच राज्य शासनाने दहा रस्त्यांसाठी २४ कोटींवर रक्कम मंजूर केली.

३१ मेपर्यंत काम करणार
सा.बां. विभागाच्या वतीने नगर नाका ते महावीर चौक क्रांती चौक ते नाईक कॉलेज रस्त्याचे काम ३१ मे २०१५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. पैठण-आैरंगाबाद रस्त्यासंबंधी केंद्राच्या मान्यतेस अधीन राहून प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

जालना रोडचे काम निकृष्ट
सार्वजनिकबांधकाम विभागातर्फे राज पेट्रोल पंप ते नाईक महाविद्यालय धूत हॉस्पिटल ते एअरपोर्ट या दोन रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंिधत रस्त्यांचे काम निकृष्ट झाले असून थातूरमातूर काम केल्याचे छायाचित्र अॅड. रूपेश जैस्वाल यांनी सादर केले असता यासंबंधी अधीक्षक अभियंत्यांनी पाहणी करून चार आठवड्यांत त्रुटी दुरुस्त कराव्यात, असे आदेश देण्यात आले. तसेच शहरातील ज्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले त्यांची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीकडून चार आठवड्यांत करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
महावीर स्तंभ स्थलांतरास मान्यता
महावीरचौक (बाबा पंप) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथील महावीर स्तंभ हलवण्यास महापालिका आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता प्रदान केल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले; परंतु हा प्रश्न महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवून स्तंभ कुठे स्थलांतरित करायचा यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

उड्डाण पुलांचा तपशील सादर
शहरातीलउड्डाणपुलांचा विकास करणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळास उड्डाणपूल निर्मितीमध्ये महापालिकेने सहकार्य करावे, असेही आदेशित करण्यात आले आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात कुठेही अडथळा येता कामा नये. शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामाची माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली. महावीर चौक उड्डाणपुलाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून ३१ जानेवारी २०१६ रोजी पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल. मोंढा नाका उड्डाणपुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून १२ मे २०१५ रोजी काम पूर्ण केले जाईल. सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपुलाचे काम ३८ टक्के पूर्ण झाले असून पूल १२ फेब्रुवारी २०१६ रोजी वाहतुकीस खुला केला जाईल, असे हायकोर्टात सांगण्यात आले.