आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत टीडीआर झोनिंग रद्द, महापालिकेच्या प्रस्तावामुळे घरे स्वस्त होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जुन्या शहरासह औरंगाबाद शहराचा तोंडवळा बदलणारे टीडीआरचे नवीन धोरण मनपाने प्रस्तावित केले आहे. त्यामुळे शहरात 14 ते 15 मजली टाॅवर उभे राहू शकणार आहेत. टीडीआरचे जुने झोनिंग रद्द करून रेडीरेकनरच्या आधारे टीडीआर कुठेही वापरण्याची मुभा देण्यात येणार असल्याने मातीमोल भावाने एकगठ्ठा टीडीआर विकत घेण्याच्या काही बिल्डरांच्या उद्योगाला चाप बसणार आहे. याचा फायदा म्हणून जुन्या भागासह शहरात घरांच्या किमती कमी होण्याची आशा पल्लवित झाली आहे. याशिवाय जुन्या धोरणामुळे मागे पडलेल्या जुन्या शहराचेही रुपडे बदलणार आहे.
महानगरपालिकेच्या येत्या ३ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या वतीने टीडीआरच्या वापरात बदलाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीचा २५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शहराच्या पद्धतशीर विकासासाठी पिंपरी-चिंचवड मनपाची विकास नियंत्रण नियमावली अर्थात डीसी रुल्स लागू करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहराची थांबलेली वाढ पाहता त्याला चालना देण्यासाठी हे दोन्ही बदल करण्याबाबत पालकमंत्री रामदास कदम यांनी आग्रही भूमिका घेतली होती. भाजपनेही बदलाचीच भूमिका घेतली होती. त्यातून हे प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर येणार आहेत.
जुन्याशहरात घरे स्वस्त होणार : जुन्याशहरात विकासकांना टीडीआर, एफएसआयची मर्यादा असल्याने चार मजल्यांच्या वर अपार्टमेंट्स बांधता येत नव्हती. परिणामी कमी फ्लॅट जास्त किमतीला विकावे लागत होते. आता हे प्रमाण बदलणार असल्याने मोठ्या इमारती वाढून घरांच्या किमती कमी होणार आहेत.
उंचइमारतींचा फायदा : शहरचारही बाजूंना दिवसागणिक विस्तारत असताना सगळीकडे रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, साफसफाई या नागरी सुविधा देताना मनपाची प्रचंड दमछाक होत असते. शहराचा समांतर विकास झाल्याने ही समस्या निर्माण झाली. आता उत्तुंग इमारती शहरातच झाल्यास या पायाभूत सुविधा देणे तुलनेने मनपाला सोपे जाणार आहे. मजल्यांमधूनपार्किंग वगळणार :टीडीआर वापरणाऱ्या इमारतींसाठी त्या इमारतीतील संपूर्ण मजला पार्किंग म्हणून वापरला जात असल्यास इमारतीची उंची मोजताना पार्किंगच्या मजल्याची उंची त्यामधून वगळण्यात येणार आहे.

दोनच टीडीआर झाेन
शहराच्या इतर भागांचाही विकास व्हावा म्हणून टीडीआरसाठी अ, ब, क, ड, इ असे पाच झोन केले होते. आता दोनच झोन असून झोन अ हा गावठाण, दाटीवाटीचा विकसित भाग असेल व त्याव्यतिरिक्तचा भाग हा अ १ असेल. यात मंजूर रेखांकनातील ९ मीटरच्या रस्त्यावरील भूखंडांवर झोन अ मधून उपलब्ध टीडीआर वापरता येईल.

तीन मार्गांवरच्या भागांच्या विकासाला मिळेल चालना
नवीन प्रस्तावानुसार जालना रोड, जळगाव रोड व मुंबई रोड हे राष्ट्रीय महामार्ग व राज्य रस्त्यांवरील भाग यांना टीडीआर वापराला प्रतिबंध असेल, तर सेव्हन हिल्स ते गारखेडा सूतगिरणी, क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रोड व अमरप्रीत ते दर्गा मार्गे रेल्वे क्राॅसिंग या मार्गांवरील विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.