आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस थांबा, मला वसुली करू द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुकुंदवाडीच्या अंबिकानगरातील (गल्ली क्रमांक-5) एका दांपत्याच्या घरात अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय सुरू आहे. ग्राहकांची वर्दळ आणि वेश्यांमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले. त्यामुळे या त्रासापासून सुटकेची ‘याचना’ मुकुंदवाडी ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍याकडे करण्यात आली. 60 महिलांसह 75 जणांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (26 डिसेंबर) ठाणे गाठले. पण ‘दोन दिवस थांबा, मला वसुली करायची आहे.!’ असा सल्ला देऊन त्यांनी काढता पाय घेतला.

यापूर्वी मुकुंदवाडी पोलिसांनी एकदा गुन्हा दाखल करून, तर एक वेळा तंबी देऊनही अंबिकानगर येथील गल्ली क्रमांक 5 मध्ये दांपत्याच्या घरात राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू आहे. रात्री -अपरात्री तर कधी दिवसाही या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्रास होत असल्याचा आरोप केला. चव्हाण यांच्या घरासमोर सार्वजनिक पाणवठय़ाच्या वापरासाठी विंधन विहीर आहे. येथे पाणी भरणार्‍या महिलांची ग्राहकांनी अनेक वेळा छेड काढल्याचे प्रकार घडल्याचे महिलांनी त्यांना सांगितले. तरुण व किशोरवयीन मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकारामुळे ओढवत असलेली ‘आपबिती’ सांगण्यासाठी 60 महिला आणि 15 युवकांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिकार्‍याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कल्याणच्या नियोजित कार्यक्रमासाठी आर्थिक वसुलीत व्यग्र असल्यामुळे त्यांनी महत्त्वाच्या फाइलवर गाडीत बसूनच सह्या केल्या. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीसमोर महिलांशी चर्चा करण्याऐवजी त्यांनी दालनात बोलावून सर्वांची समजूत काढली.

पोलिस कल्याण ऑर्केस्ट्रासाठी निधी संकलन : देवगिरी मैदानावर 4 जानेवारी रोजी पोलिस मुख्यालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या आर्थिक तजविजीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍याकडे प्रत्येकी पाच लाखांच्या वसुलीचे ‘टार्गेट’ दिले आहे. त्यासाठी किमान पाचशे आणि कमाल पाच हजार रुपयांच्या पावत्या घेऊन पोलिस अधिकारी फिरत आहेत. मुकुंदवाडीच्या पोलिस अधिकार्‍याकडे हे काम सोपवल्यामुळे त्यांना गुन्ह्याचा तपास करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी शिष्टमंडळाला दोन दिवस थांबण्याचा सल्ला दिला. पोलिस मुख्यालयाच्या कामांना आधी प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या कामात लक्ष घालावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.