आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक यंत्रणेवर सोपवा बंद घराची जबाबदारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सुट्यांत गावाला जायचे म्हटले की चोरांची भीती सतावते; परंतु आता अत्याधुनिक यंत्रांच्या भरवशावर तुम्ही सुट्यांचा निश्चिंत आनंद लुटू शकाल. हायटेक सीसीटीव्ही, अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिम, पासवर्ड लॉक, कंपाउंड वॉल सेन्सर अशा नानाविध यंत्रणा वाजवी दरात बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.

कोणी नसताना घरात शिरणार्‍या चोरट्यांना पकडण्यासाठी अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिम 15 दिवसांपूर्वी आली आहे. अज्ञात व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर सायरन वाजतो. फिंगरप्रिंट लॉक, फेसरीडिंग लॉकची सोय असून कंपाउंड वॉल सेन्सर आहे. पासवर्ड आणि फिंगरप्रिंटशिवाय दार उघडणार नाही, अशी यंत्रणा आहे. काच, फायबर, लोखंड, लाकडावर लॉक बसवता येतात.

फेसरीडिंग सिस्टिम
कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्याचा रेटिना आणि हाडांची संरचना फेसरीडिंग सिस्टिममध्ये लोड करता येते. दरवाजावर लावल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीशिवाय अज्ञाताने डोकावताच त्याचे छायाचित्र इंटरनेटच्या माध्यमातून मोबाइलवरही पाहता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चार व्यक्तीच पासवर्डचा वापर करू शकतात. 20 हजार व्यक्तींचा डाटा यात लोड करता येऊ शकतो. या उपकरणांची किंमत 25 हजारांपासून सुरू होते. अज्ञात व्यक्तीला घरात प्रवेश द्यावयाचा असेल तर मोबाइल, इंटरनेटद्वारे मेसेज पाठवून दार उघडण्याची सुविधा यामध्ये आहे.

‘इन्फ्रारेड बॅरिअर’ सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण
बंगल्याच्या सुरक्षेसाठी 15 ते 160 मीटरपर्यंतच्या कंपाउंड वॉलवर सेन्सर्स बसवता येते. कंपाउंड वॉलवरून कुणी उडी मारून आत शिरण्याचा प्रयत्न केला तर सेन्सरचे इन्फ्रारेड बिम जागृत होऊन सायरन वाजतो. या यंत्रणेला इन्फ्रारेड बॅरिअर असे म्हणतात. याची किंमत साडेआठ हजारांपासून 25 हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये चायना मेडचाही पर्याय उपलब्ध आहे.

गॅस गळती आणि पाण्याचे रक्षण
ज्वलनशील पदार्थ व गॅस गळतीचा धोका टाळण्यासाठी स्टँड अलोन गॅस डिटेक्टर हे उपकरण उपलब्ध आहे. गॅस गळती झाल्यास यात 85 डेसिबलपर्यंत सायरन वाजेल. याची किंमत 3 हजार रुपये आहे. याच प्रकारे पाण्याची गळती रोखण्यासाठी पण सायरनयुक्त सेन्सर यंत्रणा उपलब्ध आहे.