आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयभीत आसामी विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्तांचे कवच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात शिक्षणासाठी आलेल्या ईशान्य प्रांतातील विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागावी. पोलिस 24 तास संरक्षणासाठी अलर्ट असून वेळप्रसंगी बळाचाही वापर करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त संजयकुमार म्हणाले. शुक्रवारी दुपारी 1 वाजता सातारा, छावणी, उस्मानपुरा आणि सिडकोत राहणार्‍या विद्यार्थ्यांची बैठक पोलिस आयुक्तालयात घेण्यात आली.
शिक्षणासाठी शहरात आलेल्या ईशान्य प्रांतातील विद्यार्थ्यांचे पलायन थांबावे, या अनुषंगाने विद्यार्थ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरात सुमारे अडीचशे विद्यार्थी असून, 98 जणांचीच यादी पोलिसांकडे आहे. या विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक पोलिसांनी मिळवले आहेत. त्यांना धमकावणार्‍यांची माहिती पोलिसांना हेल्पलाइनवर कळवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांच्या संरक्षणासाठी नव्याने दोन हेल्पलाइन पोलिस नियंत्रण कक्षात सुरू केल्या आहेत.

आसाम हिंसाचाराच्या धर्तीवर बंदोबस्त - आसाममध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. त्याचे शहरात पडसाद उमटू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीएसएफच्या दोन तुकड्या, राज्य सुरक्षा दलाची एक तुकडी मागवण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी फिक्स पॉइंट, स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आली आहे. तसेच 350 होमगार्ड आणि तीन हजार पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

गस्त वाढवली - सिडको, उस्मानपुरा, छावणी आणि सातार्‍यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांची गस्त वाढवण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न - ईशान्य प्रांतातील विद्यार्थी विविध जाती-धर्माचे आहेत. त्यांची भाषाही वेगवेगळी आहे. मात्र, काही राजकीय मंडळी स्वत:च्या फायद्यासाठी भावना भडकावत आहे. हा प्रकार जाणूनबुजून सुरू असून ठरावीक एका समाजावर लक्ष केंद्रित केले जात असून, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त यांनी केले.
हेल्पलाइन
9545984453
9545982124

येथे साधा संपर्क
सिडको पोलिस ठाणे : 2240553
छावणी पोलिस ठाणे : 2240554
उस्मानपुरा पोलिस ठाणे : 2240561
सातारा पोलिस ठाणे : 2240565
नियंत्रण कक्ष : 100, 2240500