आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याविरोधात २९ मे रोजी निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडेंच्या कार्यपद्धतीविरोधात विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. साई अभियांत्रिकीप्रकरणी कुलगुरूंना मुख्य आरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांनी केली आहे. कुलगुरूंच्या विरोधात २९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

श्री साई इन्स्टिट्यूटच्या परीक्षेतील बोगसगिरीमुळे विद्यापीठाची बदनामी झाली. या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ‘मराठवाड्याने जबाबदारी घ्यावी’ असे अजब विधान केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष पंडित नवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली अॅड. मनोज सरीन आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे यांनी २३ मे रोजी सुभेदारीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे भीमशक्तीचे दिनकर ओंकार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत ‘कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

२९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर कुलगुरूंच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या बैठकीला देवानंद वानखेडे, दिगंबर गंगावणे, किशोर जाधव, सचिन निकम, साहेबराव नवतुरे उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरूंना दिलेल्या स्वतंत्र निवेदनातूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय, सिडको एन-३ येथील व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज आणि आष्टी येथील परीक्षा केंद्रावरील तोतया विद्यार्थीप्रकरणी कुलगुरूंनी गंभीर स्वरूपाची कारवाई केली असती तर साई अभियांत्रिकीमध्ये गैरप्रकार घडलाच नसता. त्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश सचिव अक्षय पाटील, मयूर सोनवणे यांनी केली आहे. 

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाल्य देताहेत परीक्षा 
नियमानुसारमुले परीक्षा देत असतील तर अशा स्टाफ मेंबर्सना परीक्षा भवनातून दूर ठेवण्याचा नियम आहे. तरीही सहायक कुलसचिव आडे यांच्या मुलाने एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून परीक्षा दिल्याचा आरोप आहे. प्रोग्रामर दिवाकर पाठक आणि डंके यांच्या मुलांनीही देवगिरी अभियांत्रिकीतून परीक्षा दिल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. राजेश रगडेंनी अशा पालक-पाल्यांची माहिती संकलित करून कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 
बातम्या आणखी आहेत...