आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prozone Mall Electricity Cutting Issue At Aurangabad

तीन कोटी थकवल्याने ‘प्रोझोन’मॉलची वीज तोडली; दहा दिवसांत जनरेटरवर 12 लाख खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तीन महिन्यांपासून तीन कोटींची थकबाकी न भरल्यामुळे जीटीएलने प्रोझोन मॉलची वीज खंडित केली. पुरवठा तोडण्यात आल्यामुळे प्रोझोनने आता जनरेटरचा पर्याय निवडला. त्यासाठी दहा दिवसांत जवळपास 12 लाख रुपये खर्चण्यात आले आहेत.

प्रोझोनमध्ये चित्रपटगृह, सभागृह, नामांकित कंपनीची दुकाने, लहान मुलांना खेळण्यासाठी यांत्रिकी साहित्य, अंतर्गत रोषणाई, वातानुकूलित सेवा, वरील मजल्यावर जाण्यासाठी सरकता जिना आदीवर महिन्याला सरासरी सात लाख युनिट वीज खर्च होते. 24 तास रोषणाईवरच मॉलमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. जेवढे युनिट मॉल खर्च करते ती वीज विकत घेण्यासाठी जीटीएल कंपनीला प्रथम रक्कम अदा करावी लागते आणि नंतर मॉलला पुरवठा केला जातो. थकबाकीच्या संदर्भात जीटीएलने 30 ऑगस्टला सक्तीची कारवाई करून वीजपुरवठा खंडित केला.

भाडेकरू देतात, पण. : मॉलमधील भाडेकरू दर महिन्याला व्यवस्थापनाला गाळ्यांचे भाडे आणि विद्युत बिल देतात. पण व्यवस्थापनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचा 3 कोटी रुपयांचा भरणा केलेला नाही.

काय म्हणतात अधिकारी ?
प्रोझोनच्या व्यवस्थापकांनी तीन महिन्यांचे वीज बिल भरलेले नाही, म्हणून वीज कपात केली आहे. थकबाकी अदा केल्याशिवाय पुरवठा पूर्ववत केला जाणार नाही.
- सुनील वालावलकर, सहयोगी उपाध्यक्ष, जीटीएल

मला अधिकार नाही
मला मीडियाशी बोलण्याचा अधिकार नाही. अनिल इरावणे बाहेरगावी गेलेले आहेत. ते 20 सप्टेंबरला येतील आणि तेच माहिती देतील.
- सिद्धार्थ सारंगी, मार्केटिंग अधिकारी, प्रोझोन

जनरेटरवर मॉलची रोषणाई
दहा दिवसांपासून चार जनरेटरवर मॉलची रोषणाई सुरू आहे. त्याला रोज दोन हजार लिटर डिझेल लागत आहे. एका दिवसाला डिझेलसाठी 1 लाख 20 हजार 200 रुपये खर्च येत आहे.