आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेवांतर्गत पीएसआय परीक्षेला 145 पोलिसांची दांडी; महिन्यानंतर येणार निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सेवांतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत 145 पोलिस कर्मचार्‍यांनी दांडी मारली. औरंगाबाद परिक्षेत्रात एकूण 2042 जणांनी पदोन्नतीतून पीएसआय होण्यासाठी परीक्षा अर्ज सादर केले होते. 30 ऑगस्टपासून सुरू झालेल्या तीनदिवसीय परीक्षेत 1930 जणांनी हजेरी लावली. सर्व प्रक्रिया मुंबई येथील मुख्यालयातून पार पडली असून महिन्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी सांगितले आहे.

बारा वर्षांनंतर सेवांतर्गत पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणार्‍यांसाठी पोलिस विभागातर्फे एमजीएम येथे तीनदिवसीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस शिपाई ते सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनी या परीक्षेत भाग घेतला. राज्यात एकूण सेवांतर्गत पीएसआयच्या 1045 जागा असून त्यासाठी 26 हजार कर्मचार्‍यांनी अर्ज केले आहेत. बिंदुनामावलीप्रमाणे सर्व जागांचे आरक्षणही दिले जाणार असल्याने अनेकांनी गांभीर्याने परीक्षेत सहभाग नोंदवला. दुपारी तीन ते सहापर्यंत शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. एमजीएम कॅम्पसमध्ये 200 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी तैनात असल्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. शहर पोलिसांतील 760 जणांनी परीक्षा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 31 ऑगस्टलाही कायद्याशी संबंधित एक पेपर होणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

पोलिस निरीक्षकाच्या तोतयेगिरीवर प्रश्न
पीएसआय परीक्षेला 70 मार्कांचा बहुपर्यायी पेपर होता. या पेपरमध्ये पोलिस निरीक्षकाचा गणवेश घालून पोलिस असल्याचे भासवणार्‍यावर कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. बहुतांश वेळी फसवणूक म्हणून कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल होईल असा प्रश्न पडतो. परंतु लोकसेवकाचा गणवेश वापरून कपटी उद्देशाने तोतयेगिरी केल्याने त्याच्याविरुद्ध कलम 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा कायदा भारतीय संहितेमध्ये आहे. या प्रश्नामुळे अनेक जण गोंधळून गेले होते. चोरी, जबरी चोरी आणि दरोडा यामधील स्पष्टीकरण आणि फरक सांगा या लेखी प्रश्नाला 30 गुण होते. लाल दिव्याची गाडी घेऊन फिरणार्‍या तोतयाविरुद्ध कोणत्या कलमानुसार गुन्हा नोंदवता येईल असाही प्रश्न होता.

शेजारच्या उमेदवारांचा त्रास
भारतीय दंड संहिता आणि मुंबई पोलिस अधिनियम या पुस्तकाची 904 पाने आहेत. ती चाळण्यातच वेळ निघून जात आहे. परीक्षा देण्यासाठी वेळ पुरत नाही. त्यात पुन्हा शेजारचे उमेदवार एकमेकांना त्रास देत असल्याची खंतही काही उमेदवारांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या परीक्षेसाठी पोलिसांचाच बंदोबस्त
पोलिसांच्या परीक्षेसाठी पोलिसांचाच मोठा बंदोबस्त एमजीएम महाविद्यालयात होता. पोलिसांच्या लाल दिव्यांच्या गाड्या पाहून एमजीएममध्ये काही अनुचित प्रकार घडला की काय, असा प्रश्न रस्त्यावरून जाणार्‍या सर्वसामान्य व्यक्तीला पडला होता. प्रत्येक हॉलमध्ये वॉकीटॉकी, कॅमेरामन त्याचप्रमाणे पोलिस उपायुक्त, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक हॉलमध्ये एका वरिष्ठ अधिकार्‍यासह 4 अधिकारी पोलिसांची परीक्षा घेत होते.