आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरात रस्त्याच्या कामासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा रास्ता रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी फाटा लासूर नाका ते भेंडाळा फाटा या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी गंगापूर शहर बचाव नागरी समितीच्या वतीने सोमवारी (२० जुलै) शहरातील मुख्य चौकात नागरिकांसह हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक तास घेराव घातल्यामुळे रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

या वेळी नागरी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या मागण्यांसह इतर मंजूर असलेली कामे तातडीने मार्गी लावल्याशिवाय चौकातून उठणार नाही, असा पवित्रा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे, पोलिस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांना आंदोलनस्थळी पोलिस संरक्षणात आणून तोडगा काढण्याचे सुचवले. सुखदेवे हे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्यांना थांबवत तीन वर्षांपासून निधी पडून आहे. अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे सांगून रोष प्रकट केला. आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता कार्यकारी अभियंता सुखदेवे यांनी आंदोलकांना सदर रस्त्याची दुरुस्ती उद्यापासून सुरू करून १५ दिवसांच्या आत खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...