आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनए’च्या नवीन पॅटर्नकडे पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पदभार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी कृषी वापराच्या जमिनी अकृषक (एनए) करण्यासाठी नाशिकच्या नवा पॅटर्नची घोषणा केली. त्याला बांधकाम व्यावसायिकांनी स्वीकारले असले तरी हा पॅटर्न सुरू झाल्यापासून जिल्हाधिकार्‍यांकडे एकही संचिका दाखल नाही. जुन्या पॅटर्ननुसार दाखल झालेल्या संचिकांचाच निपटारा सुरू आहे.

नवीन पॅटर्नसाठी जून महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत. जुन्या नियमानुसार एखादे लेआऊट अकृषक करण्यासाठी व्यावसायिक, वैयक्तिक व्यक्ती जिल्हाधिकार्‍यांकडे फाइल सादर करत असे. त्यानंतर आवश्यक त्या विभागांकडे ना हरकत प्रमाणपत्रांसाठी पत्र दिले जाई. त्या-त्या विभागांचे पत्र आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडून एनए दिले जात असे. यात बराच अवधी खर्ची पडत होता. तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे विक्रमकुमार यांनी नाशिक पॅटर्न राबवण्याचा निश्चय केला. या पॅटर्ननुसार ज्याला एनए करायचे आहे, त्याने सिडकोसह संबंधित सर्व विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्रांसह संचिका सादर करावी. त्यावर केवळ सात दिवसांत जिल्हाधिकार्‍यांकडून निर्णय घेतला जाईल, असे ठरले. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी बांधकाम व्यावसायिकांबरोबर बैठकही घेतली. व्यावसायिकांनीही नव्या पॅटर्नला हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार 26 ऑगस्टपासून हा पॅटर्न राबवण्याचे निश्चित झाले. त्याआधी जुलैपासून संचिका दाखल होण्याचे थांबले होते. पॅटर्न राबवण्याचे निश्चित झाल्यानंतर एकही संचिका दाखल झाली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सांगितले.

फाइल घेण्यास सुरुवात होईल
एनओसीसाठी जिल्हा प्रशासनाने पत्र द्यायचे आणि त्यानंतर सर्व एनओसी घेऊन फाइल सादर करायची, असे बैठकीत ठरले आहे. त्यानुसार काही दिवसांत फाइल सादर होण्यास सुरुवात होईल. एनओसीसह फाइल सादर झाल्यानंतर सात दिवसांत जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असे ठरले आहे. पापालाल गोयल, अध्यक्ष, क्रेडाई

सात दिवसांत निर्णय
एनओसीसह फाइल दाखल झाल्यानंतर निर्णय घेण्यास विलंब लागणार नाही. सात दिवसांत त्यावर निर्णय दिला जाईल. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच एनए करणार्‍यांचाही वेळ वाचेल. रवींद्र राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी.