आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अ‌वनती’वर करण्या मात आता ‘उन्नत शेती’चा ध्यास; कृषी विभाग जिल्ह्यात करणार जनजागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आर्थिकदृष्ट्या अवनती झालेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येणार असून या अंतर्गंत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. ही मोहीम कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणार असून याबाबत मार्गदर्शन सूचना शासनाने जारी केल्या आहेत. 

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू असून या अनुषंगाने शासनाने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गंत कृषी विभागाच्या प्रचलीत योजना पारदर्शकरित्या अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न शासनाच्यावतीने केला जाणार आहे. या अंतर्गंत पिकांची वास्तवातील उत्पादकता पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पिकांचे विविधीकरण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, बाजारातील शेतमालाचा चढउतार लक्षात घेऊन विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे, शेतीपुरक व्यवसायांना चालना देणे, बाजारपेठ आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांचे संघटन करणे, या कंपन्यांची व्यावसायिक बांधणी करणे आदी बाबींवर या मोहिमेअंतर्गंत भर देण्यात येणार आहे. या खरीप हंगामापासून या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

पीक प्रात्याक्षिक क्षेत्राची मर्यादा शंभरवरून दहा हेक्टरवर
कृषी विभागाच्यावतीने आतापर्यंत पीक प्रात्याक्षिक योजना शंभर हेक्टरवर राबविण्यात येत होती. परंतु हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या ठिकाणी असल्यामुळे कृषी सहायकांना या ठिकाणी पोहचणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद साधला जात नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे यावर्षी पासून प्रात्याक्षिक क्षेत्र दहा हेक्टरपर्यंत मर्यादीत करण्यात आले असून ते एकाच ठिकाणी असणे आवश्यक करण्यात आले आहे. एका हंगामात प्रत्येक कृषी सहायकाकडे सरासरी दोन खरीप-रब्बी, उन्हाळी हंगाम मिळून कमाल पाच प्रात्याक्षिके राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे समुह गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी जे शेतकरी ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकरी समुहांना लाभार्थी म्हणून निवडण्यात येणार आहे. 

सुक्ष्मसिंचनासाठी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी
सुक्ष्मसिंचनासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत या मोहिमेअंतर्गंत वाढविण्यात आली असून आता शेतकऱ्यांना एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून संचाची पुर्व संमती मिळाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवणे आवश्यक करण्यात आले असून अन्यथा संबंधित शेतकऱ्याचा अर्ज आपसूकच रद्द होणार आहे. अनुदान वितरीत करण्याच्या उद्देशाने सुक्ष्म सिंचन प्रस्ताव मंजुरीचे टप्पे कमी करण्यात आले आहे. 

शेडनेट, ग्रीनहाऊसचीही सुविधा 
शेतकऱ्यांना कांदा चाळ, शेड नेट, ग्रीन हाऊस, सामुदायिक शेत तळ्यासाठी लागणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित योनजेच्या पुर्वसंमतीनंतर लाभार्थ्याला दोन महिन्याच्या कालावधीत संबंधित बाबींची उभारणी करावी लागणार आहे. 

कृषी यांत्रिकी करणाला चालना 
या मोहिमेअंतर्गंत कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यात येत असून ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर खरेदीसाठी सव्वा लाख रुपये अनुदान मर्यादा लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती यंत्रांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. औजारांची निवड करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. योजनेअंतर्गंत लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून यंत्रे विकत घेता येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...