आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS- भाजपचा प्रसारमाध्यमांतील प्रवेश हिटलरप्रमाणे, औरंगाबादेत आयोजित परिसंवादातील सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशात लोकशाहीला घातक वातावरण निर्माण झाले असून आरएसएस भाजपचा प्रसारमाध्यमांतील प्रवेश हिटलरप्रमाणे आहे. वास्तव मांडणे माध्यमांचे काम असताना वस्तुस्थिती पुढे येत नाही. माध्यमे एकांगी झाली आहेत, अशी व्यथा माध्यमकर्मींनी साथी प्रवीण वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित परिसंवादात मांडली. 
 
नागेश्वरवाडीतील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात प्रवीण वाघ यांच्या व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (१ ऑक्टोबर) आयोजित ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ विषयावर परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात लोकशाहीत प्रसारमाध्यमांची भूमिका, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि वाढती गरिबी-बेरोजगारी-विषमता आणि ८० टक्के भारतीय समाज या तीन विषयांवर मान्यवरांनी विचार मांडले. या वेळी साथी सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिज्ञा शरणागत, साजिद पठाण आणि मोहसीन सय्यद यांनी पाहुण्यांचा परिचय देत सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. शमीन सौदागर यांनी आभार मानले. डाॅ. चैत्रा रेडकर यांनीही विचार मांडले. 
 
सामाजिक माध्यमे हिंसक : दिलीप वाघमारे 
माध्यमांतील वातावरण गेल्या काही वर्षांत वेगाने बदलले आहे. डेस्कला निर्णयाचा अधिकार राहिलेला नाही. लोकशाहीविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया एकांगी झाला आहे. प्रचंड बेरोजगारीमुळे बॉस म्हणेल त्याप्रमाणे बातमी लिहावी लागते. सोशल मीडिया तर हिंसक झाला आहे. तुम्ही मत मांडले की लगेच ट्रोल केले जाते. खून होतात. पत्रकार सर्वकाही सहन करत प्रचंड दबावात काम करत आहेत. गांधी आणि आंबेडकरी विचार सोबत घेऊन चालणे खूप गरजेचे आहे. सामाजिक विचार करणारे राजकारणी हद्दपार होत आहेत. 
 
माध्यमे साधने बनली आहेत : प्रा. नजीर शेख  
मीडियाचा वेग झपाट्याने वाढला आहे. मीडियाचे काम वास्तव मांडणे आहे. पण टीआरपीसाठी ती एखाद्या घटनेच्या निर्णयाला येऊन विचारधारा किंवा जनमत त्या बाजूने उभे करण्याची साधने झाली आहेत. त्यांनी माध्यम म्हणून काम करणे अपेक्षित आहे. एकांगी बातम्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. निर्णयप्रक्रियेत माध्यमे घुसखोरी करत आहेत. माध्यमे खरेदी केली जात असल्याने ते विशिष्ट बाजूनेच मत मांडतात. 
 
आरएसएस-भाजपचामीडियात प्रवेश: प्रा. जयदेव डोळे  
ज्याप्रमाणे हिटलरने हुकूमत गाजवली, त्याप्रमाणे आजच्या मीडियात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने प्रवेश केला आहे. एकाधिकारशाही विचार त्याच माध्यमांचा वापर करून लोकशाहीत घुसतो. माध्यमांतून वस्तुस्थिती पुढे येणार नाही याचीच काळजी घेतली जाते. मध्यमवर्ग प्रतिमेच्या प्रेमात पडला आहे. माध्यमांचा जनमनावर असलेला पगडा हे याचे कारण आहे. मोदींचे राज्य मध्यमवर्गाला आपलेच राज्य वाटते. सत्ता जाण्याची भीती संघाला वाटते. 
 
७०% लोकांपुढे जगण्याची भ्रांत : डॉ. जहीर अली 
स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही ७० टक्के लोकांपुढे जगण्याची भ्रांत आहे. आजही धर्म,जातींचा संघर्ष घडवून आणत सत्ता काबीज केली जात आहे, हा विकास नव्हे. भारतीय राज्यघटना आणि त्यातील मूल्ये समाजात रुजवणे हाच धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आहे. राजकारणी आणि विचारशून्य मध्यमवर्ग यांच्यावर आजच्या परिस्थितीची मदार आहे. मध्यमवर्गाने शिक्षणातून शहाणे होऊन लोकशाही मूल्यांवर अाधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी चळवळ उभारावी. 
 
सुज्ञांचा पाठिंबा हवा: प्रतिभा शिंदे 
विस्थापितांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा वेगाने आणि मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी शोषितांची किंवा विस्थापितांची एकजूट व्हायला हवी. त्याला सुज्ञ समाजाचा भक्कम पाठिंबा हवा. आज यावर चिंतन करण्यासही कुणाकडेही वेळ नाही. मात्र, नैसर्गिक संसाधने समूळ नष्ट झाल्यावर संपूर्ण मानवजात भीषण संकटात सापडणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...