आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौचालयात थाटले चक्क मल्टी सर्व्हिसेस कार्यालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको बसस्थानकाजवळ असलेल्या भव्य व्यापारी संकुलातील शौचालयावर अतिक्रमण करून एन. जे. पाटील या लेबर काँट्रॅक्टरने आपले कार्यालय सुरू केले आहे. आतील भिंत तोडून त्यांनी कार्यालयाचे सामानही त्यात ठेवले आहे. पाटील यांच्या कृतीमुळे आमची मात्र प्रचंड गैरसोय होत असल्याची संकुलातील व्यापा-यांची तक्रार आहे.
सिडकोतील टाऊन सेंटर येथील अक्षयदीप प्लाझा व्यापारी संकुलातील शौचालयावर अतिक्रमण करून कार्यालय थाटण्याचा प्रकार समोर आला आहे. 1994-95 मध्ये हे भव्य संकुल उभारण्यात आले होते. येथे तळमजल्यासह तीन मजल्यांच्या या व्यापारी संकुलात प्रत्येक मजल्यावर अंदाजे 50 गाळे असून जवळपास 250 गाळेधारक व कर्मचारी प्रतिदिन येथे काम करतात. व्यापारी व येथे काम करणा-या कर्मचा-यांच्या सोयीसाठी प्रत्येक मजल्यावर शौचालय बांधण्यात आले होते. तळमजल्यात लेबर काँट्रॅक्टर एन. जे. पाटील यांचे औरंगाबाद मल्टी सर्व्हिसेस नावाचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या भिंतीआड तळमजल्यातील शौचालयावर पाटील यांनी कब्जा केल्याचा आरोप प्रदीप पाटील यांच्यासह इतरांनी केला आहे.लेबर कंत्राटदार पाटील यांनी तळमजल्यातील शौचालयात कार्यालय तर सुरू केलेच, शिवाय वरच्या मजल्यावरील शौचालयावर ताबा मिळवला आहे. यामुळे इतर व्यापा-यांची गैरसोय होत आहे. याबाबत बिल्डर तसेच महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
काय म्हणतात तक्रारदार
तळमजल्यातील शौचालयावर पाटील यांनी अतिक्रमण केले आहेच, शिवाय वरच्या पहिल्या मजल्यावरील प्रसाधनगृहावरही ते हक्क बजावत आहेत. यासंदर्भात आम्ही बिल्डर आणि महानगरपालिकेला वारंवार तक्रार केली. परंतु त्याचा काहीही उपयोेग होत नाही.
-प्रदीप म्हस्के पाटील
पाटील यांनी शौचालयावर अतिक्रमण केल्यामुळे महिला कर्मचा-यांची मोठी अडचण होते. त्यामुळे कामावर महिला कर्मचारी ठेवता येत नाही. संबंधितांना समस्या सांगितली असता ही जागा आपण विकत घेतल्याचे ते सांगतात. बिल्डर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
-प्रवीण रिंढे
संकुलाचे आऊटलेट कोठून काढले आहे, हेच लक्षात येत नाही. तळमजल्यातील जागेत घाण जमा होत असल्याने दुर्गधीला सामोरे जावे लागते.
-सचिन नारखेडे
अतिक्रमण पाडणार
याबाबत तक्रार आलेली आहे. इमारत निरीक्षक टी.जी. गवळी यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शहानिशा करून अतिक्रमण पाडायची कारवाई करण्यात येईल.
बी.के. गायकवाड, प्रशासकीय अधिकारी, मनपा
थेट सवाल
एन. जे. पाटील
औरंगाबाद मल्टी सर्व्हिसेस
तुम्ही शौचालय बळकावून तेथे कार्यालय थाटल्याचा व्यापा-यांचा आरोप आहे...
-हा आरोप चुकीचा आहे. येथील चार गाळ्यांमध्ये 2002 पासून आमचे कार्यालय सुरू आहे. आमच्या कार्यालयाला लागूनच मुतारी होती, परंतु तळमजल्याला ड्रेनेज व्यवस्था नसल्याने वारंवार चोकअपचे प्रमाण वाढले होते. चोकअप काढण्यासाठी कुणीही पैसे देत नव्हते. परिणामी स्वखर्चाने दुरुस्ती करत होतो. हा त्रास कायमचा बंद करण्यासाठी आम्ही मुतारीच बंद केली.
वरच्या मजल्यावरील प्रसाधनगृहावरही तुमचा कब्जा आहे.
-आम्ही वरच्या मजल्यावर असलेल्या प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये खर्च उचलला.. जे गाळेधारक दुरुस्तीचा खर्च देतील, त्यांना वापरासाठी प्रसाधनगृहाच्या किल्ल्या दिल्या जातील. यापूर्वीही अनेक गाळेधारकांना किल्ल्या दिलेल्या आहेत.