आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद: खुनाच्या आरोपाखाली हरसूल कारागृहात कच्चा कैदी म्हणून ठेवण्यात आलेल्या सचिन तायडेने पुन्हा एकदा कारागृह प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली. 27 मे रोजी तायडेने कारागृह प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या आरोपांची चौकशी करण्यासाठी 30 मे रोजी शहरात आलेल्या पुण्याच्या पथकानेसुद्धा सलीम कुत्ता याने दिलेल्या लज्जतदार नाश्त्यावर ताव मारला, असा सनसनाटी आरोप तायडेने सोमवारी केला.
सलीम कुत्ता टोळीतील पवन शर्मा याने 27 मे रोजी सचिन तायडे याच्यावर हल्ला करून त्याचा गळा चिरला होता. घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करताना गळ्याला 20 टाके देण्यात आले होते. मात्र याच वेळी तायडेने कारागृह प्रशासनाच्या सलीम कुत्ता टोळीशी असलेल्या संबंधांबाबत माध्यमांसमोर वाच्यता केली. कारागृहात कुत्ता टोळीसाठी गांजा, चरससारखे अमली पदार्थ कोठून येतात, असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता. तसेच कारागृहातील कर्मचार्यांना मॅनेज करून अनेक कैदी कारागृहातून बाहेर पडतात, असा गंभीर आरोपही तायडेने केला होता. या गंभीर आरोपांमुळे कारागृह प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित होऊ लागल्याने कारागृहाचा कारभार तपासण्यासाठी कारागृह महासंचालकांनी पुण्याच्या एका पथकाला पाठवले होते. या पथकाने 30 मे रोजी कारागृह प्रशासन आणि तेथील अधिकार्यांची झाडाझडती घेतली. आरोपींच्या बराकींचीही पाहणी केली. पण त्याबरोबरच सलीम कुत्ता याच्या खर्चाने बोलावलेला लज्जतदार नाश्ताही झोडला, असा आरोप सचिन तायडेने केला आहे.
सचिनला सोमवारी 11 वाजता घाटी रुग्णालयात अत्यंत गोपनीयरीत्या आणून गळ्याला पडलेले टाके काढण्यात आले. मात्र सचिन घाटीत आल्याचे कळताच या प्रतिनिधीने त्याला गाठले. या वेळी पोलिसांनी सचिनला बोलण्यास मनाई केली. तरीही सचिन तायडे याने त्यांचा विरोध झुगारत तोंड उघडले आणि पुण्याच्या पथकानेही कुत्ता टोळीच्या नाश्त्यावर ताव मारल्याचा आरोप केला. सध्या सचिनला खास देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.