आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या पिढीतील नातीलाही इंग्लंडमध्ये विषमतेचे चटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंजाबच्या जातीय विषमतेने आमच्या कुटुंबीयांची मने खिन्न केली होती. त्यामुळे इंग्रजांच्या राहणीमानाचे आकर्षण निर्माण झाले. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर (१९४७) आम्ही देश सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक झालो.
या घटनेला आता ६५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही इंग्लंडध्ये स्थायिक उच्चवर्णीय भारतीयांच्या मनातून जातीयवादाची भावना गेली नाही. पाचव्या पिढीतील माझ्या नातीलाही सनातन्यांच्या विषमतेला बळी पडावे लागते, अशी जळजळीत 'सल' इंग्लंडमध्ये फुले-आंबेडकरांची चळवळ चालवणाऱ्या एच. एल. विर्दी यांनी बोलून दाखवली. नागसेन वनातील मिलिंद कॉलेजला भेट देण्यासाठी विर्दी इंग्लंडहून आले आहेत. त्या वेळी त्यांच्याशी 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने खास बातचीत केली.
भारतातून जेव्हा जात्यंध लोक युरोप किंवा जगातील कुठल्याही देशात जातात तेव्हा सनातनी विचारसरणी आणि वाईट प्रवृत्तींची सुटकेस भरून घेऊन जातात. त्यामुळे विदेशात स्थायिक सनातनी जात शोधून काढण्यात पटाईत असतात. त्यानंतर शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट कंपन्यांमधील छळवादाची जंत्री सुरू होते. आजोबा रामलोक यांच्या पिढीपासून मी पंधरा वर्षांचा असतानाच वडील उजागर यांच्यासोबतच इंग्लंडमध्ये स्थायिक झालो आहे. माझ्या तरुण नातीलाही इंग्लंडमध्ये विषमतेचे चटके बसतात. मग भारतातून जातीयवाद कसा नष्ट होईल, असा सवालही त्यांनी केला. इंग्लंडच्या संसदेने २३ एप्रिल २०१३ रोजी जातीय विषमतेविरोधात कायदा आणला आहे. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या विषमता पाळणाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागेल. भारतात अ‍ॅट्रॉसिटीची अंमलबजावणी होत नाही, पण इंग्लंडमध्ये कायदे कठोरपणे अमलात आणले जातात. पंजाब सोडण्यापूर्वीच मामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगितले होते. काही पुस्तकेही वाचली होती. त्यामुळे इंग्लंडमध्ये जाऊन वयाच्या २२ वर्षांपासून फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असल्याचे विर्दी यांनी सांगितले. बाबासाहेबांचे साहित्य वाचल्यामुळे बिनकामाची आक्रमकता संपली आणि सुसंस्कृत, प्रगल्भता माझ्यात आली, असेही त्यांनी नमूद केले.
धम्म अनुयायांमध्ये वाढ होतेय
ग्रेटर इंग्लंडने 'थेम्स' नदीच्या किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून बेटर सी प्लेस उभारले आहे. उत्तम पर्यटनस्थळांपैकी हे एक पार्क असून येथे गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित (म्युरल्स) शिल्पे उभारली आहेत. शिवाय इंचभर जमीनही फुकट न देणाऱ्या ब्रिटन सरकारने २६ एकर जमिनीवर पीस ऑफ पॅगोडा (बुद्ध विहार) उभारले आहे. १९८० मध्ये विहाराचे उद््घाटन झाले असून जगातील २६ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी या समारंभाला उपस्थित होते. भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मलाही खारीचा वाटा उचलायचा आहे. त्यामुळे सहा महिने इंग्लंडमध्ये आणि सहा महिने भारतात आपण फिरत असल्याचे विर्दी यांनी सांगितले.